Availability: In Stock

Vilag | विलग

90.00

Publication Date : 14/05/2005

Pages : 84

Language : Marathi

Description

नव्वदच्या दशकात शहरी व ग्रामीण जीवनाच्या सर्वच स्तरांवर होऊ लागलेल्या . पडझडीला कवितेतून समर्थपणे प्रतिक्रिया देऊ पाहणाऱ्या नव्या पिढीमध्ये तीव्र समाजभान असलेल्या कवींची संख्या लक्षणीय आहे. सर्वसामान्यांच्या जगण्यातले छोटेमोठे दैनंदिन ताणतणाव, संघर्ष, नैतिक व मूल्यात्मक अध: पतन इ. कवितेच्या भाषेत मांडण्याची संवेदनशीलता मराठी कवितेत प्रथमच इतक्या थेटपणे व सामुहिक आवाजात ही पिढी दाखवते आहे. गणेश वसईकर यांची ‘विलग’ मधील कविता वाचतांना नेमका हाच अनुभव आपल्याला येतो.

जागतिकीकरण व तद्आनुषंगिक उलथापालथीच्या पार्श्वभूमीवर खेड्याचे गाव, गावाचे छोटे शहर, उपनगराचे नगर, आणखी मोठे शहर… असे परिवर्तन होत जात असतांना आपल्या जगण्याचेही अधिकाधिक ‘शहरीकरण’ होत जाणे या प्रक्रियेमध्ये अपरिहार्य बनले आहे; तरी सुध्दा मुळात आपण ज्या मातीत रुजलो, काल-परवापर्यंत वाढलो, तिथून उखडले जात असल्याची तडफड इतक्या सहजी अंगावेगळी करता येत नाही. ही अशी आपल्या मूळांपासून तुटत जात असल्याची अस्वस्थता; बोली, लोकसंस्कृती, कुळाचार, माणसे आणि त्यांच्या निष्ठा, या सर्वांपासून ‘विलग’ होत जात परात्म बनत असल्याची जीवघेणी कळ वसईकरांच्या कवितेतून सतत जाणवत राहते. या अर्थाने ही कविता आपल्या नव्याने स्वीकारलेल्या शहरी आयुष्यातील बकालपणा, धावपळ, स्पर्धा, पशूत्वभाव, नात्यांची घुसमट, सर्जनशीलतेची कोंडी, चंगळवादी जीवनशैली आणि आधीच्या स्थिर, शांत जगण्यातील सहानुभावाचा वारसा, प्रेम, श्रद्धा, मूल्यविचार, मनुष्यत्वाच्या संस्कारांची जपणूक, अशा द्वंद्वात्मक आशयसूत्रांभोवती रेंगाळताना दिसते. बाह्य बदलांच्या झंझावातात स्वतःचं व्यक्तिगत आयुष्यही फरफटत जातांना आपण रोखू शकत नाही आणि तरीही नव्या व्यवस्थेला सामोरे जातांना देहा-मनावरच्या जुन्या जगण्याच्या खाणाखुणा खरवडून काढून कोरे करकरीत होता येत नाही, अशा पेचात सापडलेल्या वर्तमान पिढीची मानसिकता प्रातिनिधिक स्वरुपात व्यक्त करणारी ही कविता म्हणूनच अत्यंत आश्वासक कविता म्हणावी लागेल.