Description
या कविता वाचतांना वाचकांना धक्का बसतो. पारंपारिक कवितांपेक्षा त्या वेगळ्या आहेत. परमेश्वर, धर्म, संस्कृती, महापुरुष, विचारसरणी, चळवळी, कार्यकर्ते एवढेच काय, मैत्री, प्रेयसी आणि कवींवरचाही कवीचा विश्वास उडालेला आहे. संगणकाच्या युगातही सामान्य माणसाला न्याय मिळत नाही. याची तीव्र जाणीव कवीला होते. कवी नुसती खंत व्यक्त करत नाही. प्रसंगी त्याचा उद्रेक होतो. पण वर्तमान समजून आले तरी करता काहीच येत नाही ही हतबलता त्याच्या वाटयाला येते. कवीही वर्तमानाचाच एक भाग आहे म्हणून शेवटी तो स्वतःबद्दलही घृणा व्यक्त करतो. जिच्यातून तो व्यक्त होतो त्या ‘कविता’ माध्यमाबदलही कवी असमाधानी आहे. म्हणून कवी भाषेच्या नव्या रुपांतून संवाद साधू पाहतो- पावसाशी, प्रेयसीशी, सामान्यांशीही! पण तोही अपुरा राहतो. शेवटी कवी लैंगिक आविष्कारातून व्यक्त होऊ बघतो. पण तिथेही तडफड वाढत जाते. जगण्यातल्या सर्व स्तरांवर अनुभवास येणारी हतबलता हे या कवितेचे सूत्र आहे. ऐन पस्तिशीत निराश झालेल्या कवीची ही अनुभूती वाचकांना वर्तमानाचे वेगळेच भान देते. – प्रा. देवानंद सोनटक्के