Description
कोणतीही संस्था उभी करणं, ती सातत्यानं यशस्वीपणे कार्यरत ठेवणं. हे मोठं चिकाटीचं आणि मेहनीतचं काम आहे. त्यातही पतसंस्थेसारख्या आर्थिक व्यवहाराशी निगडीत असलेल्या संस्थेच्या बाबतीत तर विश्वासार्हता, सचोटी अशा इतरही अनेक बाबी जोडलेल्या असतात. आर्थिकतेच्या नव्या-नव्या योजना राबवून त्या व्यवहारातील विकासाचा आलेख चढता ठेवावा लागतो. तरच त्या संस्थेतील सदस्य वाढतात आणि टिकूनही राहतात.
मैत्रीण प्रा. आशा भांगरे यांनी संगमनेर येथे गृहलक्ष्मी महिला पतसंस्था सुरु केली आणि गेली ३५ वर्षे त्यांनी अतिशय दिमाखदारपणे ही संस्था कार्यरत ठेवली आहे. वाढवली आहे. सुमारे ७०० ते १००० महिलांना सोबत घेऊन त्या हे काम करीत आहेत. यातून अनेक गरजू महिलांचे प्रश्न सोडवण्यात आले आहेत. आपल्या कामातून अनेक महिलांना आशाताईंनी आत्मविश्वास दिला त्याप्रमाणे सक्षमपणे जगण्याचे बळही दिले आहे.
या पुस्तकात प्रा. आशाताईंनी स्वतःच्या जगण्याचा प्रवास रेखाटला आहे. त्याबरोबरच त्यांनी उभ्या केलेल्या गृहलक्ष्मी महिला पतसंस्थेच्या प्रवासही खूप नेमकेपणाने मांडला आहे. अगदी सुरुवातीपासून त्यांचे काम पाहत आले आहे. त्यांच्या कामाविषयी मला सततच कौतुक आणि आदर वाटत आलेला आहे. प्रा. आशाताईंना त्यांच्या कामासाठी मनापासून शुभेच्छा !
या पुस्तक लेखनासाठी खूप खूप अभिनंदन. हे पुस्तक महिलांना आणि वाचकांना प्रेरणा देणारे ठरेल., असा मला विश्वास वाटतो.- सुमती लांडे