Description
सर्जनशील, मनाचा आविष्कार आहे. सर्वस्वी शेतीवर अवलंबून असणाऱ्या माणसांच्या कृषिनिष्ठ मूल्य जाणिवा त्यांच्या लेखनातून ठळकपणे अधोरेखित होतात. भोवतीच्या भयग्रस्त वास्तवाला दिलेले ‘कलात्मक कथारूप’ हे त्यांच्या लेखनाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. त्यातून वाङ्मयीन पातळीवर त्यांचे लेखन लक्षवेधी ठरते.
त्यांच्या कथांमध्ये येणाऱ्या व्यक्तिरेखांचा सामाजिक जाणिवांचा व अंतर्मनाचा ते अतिशय तन्मयतेने वेध घेतात. जागतिकीकरणाच्या कधी छुप्या तर कधी थेटपणे होणाऱ्या आक्रमणामुळे अपरिहार्यपणे येथील माणसांची मने दुभंगू लागली आहेत. बांधावरचा पळस पाठीशी घेऊन वरईवरच्या वारूळाची पूजा करण्यातील नितळ-तुडुंब ; मनस्वी सुख कुठे तरी गढूळले आहे. जुनी मूल्ये झपाट्याने नष्ट होताहेत आणि भ्रष्ट समाज व्यवस्थेच्या प्रवा मार्गक्रमण करताना नवे काही हाती येत नाही. त्यामुळे एका उदास पोकळीचे अस्वस्थपण मुकाटपणे सोसण्याचे भागधेय ग्राम व्यवस्थेतील अनेकांच्या भाळी आले आहे. कृषिव्यवस्थेतील या घटकात अभावग्रस्त कुटुंबप्रमुख प्रत्यही दाहझळांनी त्रस्त होणाऱ्या स्त्रिया ; समस्यांच्या निवडुंगी खुरट्या गायरानात काचकुयरीची खाज अनुभवणारा दिशाहीन बेकार तरुण वर्ग; या सगळ्यांचा समावेश आहे.
जबाबदार राजकीय नेतृत्वाच्या आणि चिरस्थायी पायाभूत श्रमसाधनांच्या अभावी या सर्व घटकांची होणारी मानसिक आणि आर्थिक पातळीवरची घुसळण त्यांना गुदमरून टाकणारी आहे. या खळबळजनक अवस्थेत मार्गक्रमण करणाऱ्या समाजव्यवस्थेत उद्रेकाला आनंदगर्भी चिरस्थायी नियोजनाच्या माध्यमातून वेळीच बांध घातला गेला नाही तर इथल्या माती माणसांची ही बंडखोर मने समग्र क्रांतीचा वेध घेणारी ‘उठावण’ केल्याशिवाय राहणार नाहीत यांचे सूचन सुप्तपणे या कथांमधून होताना दिसते.