Description
मलिक अंबरानें जमिनीची मापणी करविली. बागायत व जिरायत असे मुख्य दोन प्रकार ठरवून त्यांतहि चार प्रती मुक्रर केल्या. जमिनीच्या उत्पन्नाच्या २/५ भाग सरकारांत धान्यरूपानें कर म्हणून घेण्याचें मुक्रर केलें. ग्रामसंस्थांचें पुनरुज्जीवन करून पाटिल-कुळकण्यांचीं वतनें नक्की केली, पुढें, धान्यरूपानें कांही भाग कर म्हणून घेणे हें उभयपक्ष त्रासदायक होत आहे हें पाहून ज्या त्या जमिनींवरील एकंदर सर्व धान्याची उचक किंमत करून तिचा तिसरा हिस्सा रोकड घेण्याची पद्धति सन १६१४ च्या सुमारास त्यानें सुरू केली. मोगलाईमध्यें तोडरमल्लानें कायम धारेबंदी केली आहे ती पद्धती मलिक अंबर यास मान्य नव्हती म्हणून त्यानें ती महाराष्ट्रांत मुळींच आणिली नाही. त्याच्या हयातीत सतत लढाया सुरू असूनहि सरकारी खजिना कधींहि सर्वस्वी रिकामा झाला नाहीं.