Description
पती तुकाराम खेडकरांच्या अचानक जाण्यानं आकाशच कोसळलं… घरचा धनी… फडाचा मालक असा अचानक गेला…. पैशांची तरतूद नव्हती… चरितार्थाचाही प्रश्न होता… फडही विस्कळीत झाला… पण कांताबाई स्वस्थ बसणाऱ्यातल्या नव्हत्या… त्यांनी पुन्हा जुळवाजुळव केली… पुन्हा फड उभा राहिला… मराठी मुलुखातल्या तमाम जनतेच्या मनोरंजनासाठी ढोलकीच्या तालावर कांताबाईंचे घुंगरू पुन्हा नाचू लागले. भिंगरीसारख्या नाचणाऱ्या कांताबाईंच्या तमाशाचे तंबू हजारोंच्या उपस्थितीने गावोगावी ओसंडत वाहू लागले… खेड्यापाड्यांत वर्षाकाठी दोनशे-सव्वादोनशे दिवस फडातील दोनशे कामकरी, कलाकारांसह आपल्या परंपरागत कलेने मराठी मनाला रिझविण्यासाठी फिरणाऱ्या कांताबाई आज पंच्याहत्तरीनंतरही आपल्याच मस्तीत दंग आहेत… फडाच्या रुपानं खेडकरांचं नाव जिवंत ठेवलं… मुलगा रघुवीर फड चालविण्यास समर्थ बनला… महाराष्ट्र शासनाचा जीवनगौरव पुरस्कार मिळाला… थेट दिल्लीत तमाशा सादर करण्याचा बहुमान मिळाला… रसिकांचं उदंड प्रेम मिळालं, कलाकाराला आणखी काय हवं? भल्या पहाटेची शुक्राची चांदणी आजही त्यांना याद देते लाडीवाळपणे रेंगाळणाऱ्या त्या दिवसातल्या लावणीची..!