Description
अजय कांडर यांची कविता कोकणातील काबाडकष्ट करणाऱ्या स्त्रीचे भावविश्व आणि कृषीजन व्यवस्थेचे ताणेबाणे शब्दबद्ध करते. निसर्ग, प्राणी, पशु-पक्षी यांच्यासह वाढतांना स्त्रीच्या जगण्यातील धारणा, समजुती, वेदनांची भुयारं खणून त्यांना कवितारूप देण्यात कांडर यशस्वी होतात. कोकणातील निसर्ग, त्याचं गूढपण आणि मानवी जगण्याला नवेपण बहाल करण्याचं त्याचं नित्य नवं ताजेपण हे ह्या कवितेच्या गाभ्यापाशी वास करते. समुद्राची अखंड गाज या कवितेतल्या शब्दकळेत काठोकाठ भरलेली असल्यामुळे विस्तीर्ण खुल्या अवकाशाला ती सतत साद घालते.
आज लिहिल्या जाणाऱ्या कवितांत ह्या कवितेची अरण्यवाट नवखी आणि स्वतःचे वेगळेपण सिद्ध करणारी आहे. कधी कृषीजन व्यवस्थेचे जगण्यातील संकेत ह्या कवितेत प्रतिमारूप धारण करतात, तर कधी झाडांनाच माणूसपण प्राप्त होते. मौखिक परंपरेतील सत्त्व पचवून घनदाट होत जाणे हा ह्या कवितेचा स्वभाव आहे, त्यामुळे सरळ थेट अवतरणारी ही कविता वाचणाऱ्याला खोल, आतून ढवळून काढते, हे ह्या कवितेचे मोठे सामर्थ्य आहे. कांडर यांच्या ह्या मोजक्या कविता आजच्या कवितेच्या खळखळाटात आपला संयत, सखोल, सघन प्रभावी स्वर अधोरेखीत करून काव्यविश्वाला प्रगल्भ करतील याची खात्री वाटते.