Description
मानवाच्या प्रमुख गरजा अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या आहेत. यापैकी प्रामुख्याने अन्न व वस्त्र या गरजांचे मूळ आपणास शेतीव्यवसायात दिसते. शेतकऱ्यांनी हवामानाशी सतत झगडा देऊन निर्माण केलेल्या शेतीमालाची मिळेल त्या भावाने विक्री करून येणाऱ्या पैशावर आपल्या गरजा भागविण्याचा प्रयत्न शेतकरी सतत करीत असतो.
भारत देश हा खेड्यांचा देश आहे. भारताला स्वातंत्र्य मिळून देखील भारताच्या ग्रामीण जीवनातील अपार दारिद्र्य, शेतमजुरांची बेरोजगारी, शेतकऱ्यांचा कर्जबाजारीपणा आणि कनिष्ठ राहणीमान अजूनही सुधारलेले नाही, ही सर्व परिस्थिती सुधारण्यासाठी शासनाने विविध योजनांची अंमलबजावणी केली आहे.
कोणत्याही देशाच्या आर्थिक योजनांचा प्रमुख उद्देश हा लोकांचे राहणीमान उंचावणे हाच असतो. जीवन व राहणीमान हे अनेक गोष्टींवर अवलंबून असले तरी त्याचा संबंध उत्पन्न व उत्पादकता यांच्याशीच जास्त येतो. चांगले जीवन व राहणीमान उपभोगण्यासाठी देशाचे औद्योगिक व शेती उत्पादन चांगले असावे लागते आणि चांगले अर्थिक उत्पादन चांगल्या उत्पादकतेपासून प्राप्त होते.
ग्रामीण भागात अनेक प्रकारचे कृषिउद्योग मोठ्या प्रमाणावर सुरू झाले आणि या उद्योग व्यवसायात नव्या तंत्रज्ञानासहित मोठी गुंतवणूक केली तर शेतीमालाला वाढती मागणी मिळून त्यांचे बाजारभाव स्थिर राहतील. त्याचबरोबर दुर्बल घटकांना काम मिळून खेड्यातील बेकारी व अर्धबेकारी नष्ट होऊन गरीब जनतेचे राहणीमान उंचावेल. गामीण भागात, विशेषत: महाराष्ट्रातील छोट्या खेड्यांत शेतकऱ्यांना, शेतमजुरांना व महिलांना छोट्या-मोठ्या प्रमाणावर करता येण्यासारखे आणि शेतीला पोषक असे अनेक प्रकारचे जोड धंदे किंवा स्वतंत्र धंदे आहेत. शेतकऱ्यांना शेती बरोबरच इतर अनेक प्रकारचे जोड धंदे / व्यवसाय करता येण्यासारखे आहेत. या सर्व व्यवसायांचे प्रक्रियेंचे शास्त्रीय व तांत्रीक मार्गदर्शन शेतकरी तसेच इतर बेरोजगारांना सहज व सोप्या भाषेत उपलब्ध व्हावे या उद्देशाने “कृषि क्षेत्रातील प्रक्रिया उद्योग कोश” हे पुस्तक तयार करण्यात आले आहे. याचा उपयोग शेतकरी बांधवांना तसेच इतर बेरोजगारांना निश्चितपणे होईल अशी आम्हाला खात्री वाटते.