Description
वाडा जागा झाला हा जागतिकीकरणाच्या प्रभावाने ग्रामजीवनात झालेले परिवर्तन सूक्ष्मपणे टिपणारा कथासंग्रह. ‘ग्रामसंस्कृती आणि माणसाच्या वृत्ती प्रवृत्तींसह लेखकाने गाव साक्षात केला आहे. नापिकी, दुष्काळ, कर्जबाजारीपणा, भारनियमन अशा विविध प्रश्नांनी उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांचे भावविश्व या कथेने मोठ्या सामर्थ्यानिशी चित्रित केले आहे. ‘मरण प्रिय नाही पण काळ जगू देत नाही’ हे शेतकरी, कष्टकरी यांच्या वाट्याला आलेले दुःख लेखक विजय चव्हाण यांनी अत्यंत आत्मीयतेने मांडलेले आहे. गावकुसातील आणि गावकुसाबाहेरील माणसाचे जीवनवास्तव मांडून लेखकाने आपल्या कथेचा परीघ व्यापक केला आहे, हे या कथालेखनाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य. सत्तेसाठी मूल्यांची सर्रास होणारी मोडतोड, विकासावर मात करणारे गटातटाचे राजकारण, प्रगतीपथावर असणाऱ्या माणसाचा द्वेष या गावाला यातनांच्या दलदलीत नेणाऱ्या बाबींमधून बाहेर पडणारा दिशासूचक विचार या कथा देतात. या कथेला मूल्यसंवर्धन व आत्मशोधाचा ध्यास आहे. गावाने काळजात घर केल्यामुळेच अशी अस्सलता व ताजेपणा या कथालेखनास प्राप्त झाला आहे. या कथेतील संवाद निवेदनाची बोलीभाषा ही महत्त्वाचे सामर्थ्यस्थळ आहे. या बोलीमुळे कथाशय कमालीचा प्रत्ययकारी झाला असून मराठवाडी बोलीच्या अभ्यासकांना या कथेतील बोलीच्या अभ्यासाशिवाय पुढे जात येणार नाही, एवढे बोलीवैभव या कथेत आहे.