Availability: In Stock

Asoni Mukt | असोनि मुक्त

220.00

ISBN: 9788194459040

Publication Date: 03/08/2022

Pages: 112

Language: Marathi

Description

मोजक्याच तरीही दखलपात्र अशा लेखिकांनी आपल्या स्वतंत्र अस्तित्वाचा ठसा मराठी कथेवर यशस्वीपणे उमटवला आहे. या दशकातील अशा कथालेखिकांमध्ये निर्मोही फडके यांचा नामोल्लेख करावा लागेल. त्यांच्या ‘असोनि मुक्त’ या संग्रहातील कथा आपली ठसठशीत ओळख घेऊन अवतरल्या आहेत. छोट्याछोट्या किरकोळ गोष्टींसाठीही संघर्ष कराव्या लागणाऱ्या स्त्रिया, त्यांची मानसिक आंदोलने, स्त्रीपुरुष नात्यांचे कालानुरूप बदलते रूपबंध अशा काही सूत्रांभोवती या कथा फिरताना दिसतात. स्त्रियांच्या लेखनामध्ये अपवादाने आढळणारी स्त्रीपुरुष नातेसंबंधविषयक पक्व समज, धिटाई व मनोविश्लेषण या कथांच्या केंद्रस्थानी आहे. या कथांमधील स्त्रीपुरुष व्यक्तिरेखा एकमेकांवर कुरघोडी करण्याऐवजी एकमेकांच्या साहाय्याने अधिक समंजस आयुष्य जगणे पसंत करतात. विशेषतः स्त्री व्यक्तिरेखांचा कणखरपणा व स्वावलंबी जगण्याची असोशी त्यांच्या कथांना समकालातील आधुनिक स्त्रियांच्या जगण्याशी जोडून घेतात, हे या कथांचे एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणता येईल.

निर्मोही फडके यांचे अभिजात साहित्य-संस्कृतीचे आकलन, वर्तमान समाजाचे डोळस भान, भाषिक समज, तसेच इतिहास, पूर्वसुरींचे लेखन व मानसशास्त्रासारख्या अन्य विद्याशाखांशी आपल्या कथात्म सर्जनशील व्यवहाराला जोडून घेण्याची प्रकृती या कथांना अनोखे परिमाण मिळवून देतात. निर्मोही फडके यांच्या या सर्वच कथांमध्ये मुक्ततेची आस असलेले निवेदकाचे प्रगल्भ व समजुतदार मन जाणवत राहते. आपल्या वाट्याला आलेल्या आयुष्याला सामोरे जाताना भवतालच्या व्यक्ती वा व्यवस्थांशी अनेकदा अपरिहार्य संघर्ष करतानाही कटुता येऊ न देता समंजसपणे मुक्तीच्या दिशेने पुढे जाऊ पाहणारे हे मन आहे. या कथालेखनाचे ही एक वैशिष्ट्य म्हणून नोंदवता येईल. स्त्रीलिखित मराठी कथेच्या परंपरेमध्येही या कथांनी महत्त्वाची भर घातली आहे असे निःसंशयपणे म्हणता येईल.

Additional information

Book Author