Description
सारे अस्तित्वच झाट करून टाकणारा हा रोगट समकाल आणि त्यातल्या दिगंत अंधाराला डोळस आंधळेपणाने चाचपडणारा, उदाहरणार्थ, कुणीही अश्वत्थामा किंवा उदाहरणार्थ सिसिफस, वाट्याला आलेल्या या यातनादायी चिरंतन प्रश्नोपनिषदाचं काय करत असेल ? अक्षय शिंपी यांची कविता या अजस्त्र गुंत्याला भिडू पाहाते, उत्तर आधुनिक शतखंडित काळातल्या अप्रच्छन्न मानवी तडफडण्याला समजून घेऊ पाहाते. ती जितकी या अपर्यायी वास्तवाने बेदखल नि तडीपार केलेला मानवी ‘स्व’ धुंडाळते तितकीच या ‘स्व’ला वेढून असणाऱ्या समग्रग्रासी अंधःकाळालाही चाचपडू पाहाते. साहजिकच या कवितेला टिपिकल हळूवार होता येत नाही, तरी ती ऐकू शकते वुहानमधली इतक्या वर्षांच्या आक्रोशानंतर पुन्हा सुरू झालेली चिमण्यांची चिवचिव किंवा अनुभवू शकते कोकिळेच्या कंठातलं थरथरतं पालवीचं पाणी. मुक्तछंदाइतकीच ती लीलया अभंग प्रकारांतूनही बोलू लागते, तितकीच अनवट प्रतिमांतून ती जगण्याच्या गद्यभाषेशी संग करू पाहाते. अक्षय शिंपी यांची ही कविता म्हणजे विक्राळ काळासोबतचा सेल्फी घेण्याचाच पोएटिक यत्न आहे.
अभिजित देशपांडे