Description
‘दिवे गेलेले दिवस’ ही रंगनाथ पठारे यांची पहिली कादंबरी. पहिलेपणाच्या खुणा तिच्यात दिसतात हे खरे असले, तरी आज एक लेखक म्हणून त्यांची जी एक स्वतंत्र आणि वैशिष्ट्यपूर्ण नाममुद्रा तयार झाली आहे, तिच्या विकासाची बीजेही या कादंबरीतून ठायी ठायी दिसून येतात, हे अधिक महत्त्वाचे आहे. या कादंबरीत १९७५ चा आणीबाणीचा कालखंड आला आहे. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये भारतातली आणीबाणी ही एक अत्यंत महत्त्वाची उलथापालथ करणारी राजकीय घटना होय. या घटनेचा सर्जनशील अन्वयार्थ लावावा, असे भल्याभल्या नामवंत आणि प्रतिष्ठित मराठी कादंबरीकारांना वाटले नसताना रंगनाथ पठारेंसारख्या तरुण आणि नव्या लेखकाला हे धाडस करावेसे वाटावे, हेच मुळी लेखकाच्या संवेदनशीलतेचे, जबाबदारीचे आणि समकालीन घडामोडीबद्दल वाटणाऱ्या आस्थेचे प्रत्यंतर होय.