Description
असंख्य प्रश्नांनी भरलेल्या या विराट दुनियेत व्यक्तीच्या आपल्या म्हणून असणाऱ्या प्रश्नांना जागा आहे की नाही? जागा असेल किंवा नसेल, जागा द्या किंवा देऊ नका, व्यक्ती म्हणून प्रत्येकाला अशा आपल्या आपल्या फक्त स्वतःच्याच अशा प्रश्नांशी कायमच झगडावं लागत असतं. हे कोणालाही पटावं. ते आपल्या सगळ्यांचं वास्तव असतं. अन हे प्रत्येकी वेगळं असतं. दुनियेत अशी सात अब्ज वास्तवं या घडीला मौजूद आहेत. अन ती सगळी एकमेकांपासून भिन्न आहेत. अन त्या प्रत्येकाची आतली एक भली मोठी दुनिया आहे. तिला काही महत्त्व आहे की नाही?…
अशा प्रश्नांची दुनिया घेऊन वावरणारी काही प्रातिनिधिक पात्रं या कादंबरीत आहेत. त्यांच्या प्रश्नांची देवघेव, त्यांचे टकराव, बारक्या बारक्या इच्छा, आकांक्षा आणि हितसंबंधांचे टकराव यांच्यातून कथानक पुढे सरकत जातं. आणि प्रत्येक पात्रासाठी काही एका आरंभाजवळ येऊन थांबतं. असा आरंभ कुठे स्पष्ट कुठे अस्पष्ट सुद्धा असतो. उदाहरणार्थ लमुवेल आणि तुंगाक्का यांच्यासाठी हा आरंभ स्पष्ट दिसतो. बाकीच्यांसाठी तो तितका दिसत नाही. पण तो असतो. कारण कोणताही शेवट हा मुळात आणखी एका आरंभाचं प्रास्ताविकच असतो. म्हणून ही कादंबरी. एका आरंभाचे प्रास्ताविक.