Description

प्रा. संध्या शहापुरे यांच्या कवितेला सामाजिक अधिष्ठान आहे. या कविता संग्रहात, प्रेम, निसर्ग, बाई, समाज या विषयीच्या कविता आहेत आणि त्या सगळ्या कवितांचा पाया हा सामाजिक भान आहे. प्रा. संध्या शहापुरे यांची कविता जुनी मूल्ये टाकून न देता नव्या मूल्यधारणांची कास धरणारी कविता आहे. जुना निष्ठावान काळ पाहिलेल्या संध्या शहापुरे यांची कविता सद्य परिस्थितीविषयी तक्रार न करता जगण्याच्या सर्व अनुभवाना कवेत घेत ते वाचकापुढे मांडते. त्यांच्या कवितेचा पाया पूर्वसूरींचा आहे पण त्यांच्या कवितेची भाषा विषय आणि प्रेरणा समकालीन आहे. त्यांच्या कवितेत संस्कृती आहे पण तिचे उदात्तीकरण नाही. समकालीन जगणं अनेक कोनातून पाहत, त्यातील उणे आणि अधिक संध्या शहापुरे प्रामाणिकपणे मांडतात. संध्या शहापुरे यांच्या कविता या जुन्या आणि नव्या अशा दोन पिढीतील विविधांगी जाणिवांचा समन्वय साधणाऱ्या कविता आहेत. आधीच्या पिढीचे आचार विचार जेव्हा नव्या पिढीला जुने वाटू लागतात तेंव्हा आधीची पिढी जुनी किंवा कालबाह्य होताना दिसते. साहित्यही याला अपवाद नाही. पूर्वीच्या पंत कविता वा रविकिरण मंडळातल्या लयीतील कविता, त्या कवितांचे विषय, आता जुन्या वाटत असल्या तरीही त्या कवितातील मराठी कवितांची लय अजून आपल्या सगळ्यांच्या मनात रुंजी घालत असते. या जुन्या कवितेतील लय आणि समकालीन जाणिवांच्या कवितांचा संग्रह म्हणजे ‘हिन्दोल ‘ कवितासंग्रह.