Description
‘लोकमानस’ या ग्रंथामध्ये लेखिकेने डॉ. मधुकर वाकोडे यांच्या व्यक्तिमत्वाचा आणि संशोधीत-संपादीत साहित्याचा सर्वांगीण तसेच चिकित्सक आढावा अत्यंत मुद्देसूदपणे घेतला आहे. ग्रंथात विषयाची मांडणी नेमकेपणाने करण्यासाठी ज्या बाबींची चर्चा होणे गरजेचे असते ती करण्यात लेखिकेला उत्तम यश प्राप्त झाले आहे. एखाद्या अभ्यासकाच्या कार्याचे मूल्यमापन करताना विवरण आणि विश्लेषण यांचा समतोल साधणे अनेकवेळा अवघड होते; मात्र हा समतोल लेखिकेने अचूक साधला याचा मनस्वी आनंद झाला. त्यांचे विश्लेषण हे ताटस्थ्यपूर्ण असल्यामुळे ग्रंथाला परिपूर्णता लाभली आहे. परिणामी त्यांना मधुकर वाकोडे यांचे वाङ्मयीन व्यक्तिमत्व व्यवस्थितपणे साकार करता आले.
प्रस्तुत ग्रंथातून लेखिकेने पाळलेली एक शिस्त दिसून येते. अभ्यासविषयाच्या संदर्भात त्यांचे सातत्यपूर्ण चिंतन आणि त्यांच्या चिकित्सक वृत्तीचा प्रत्यय सर्वत्र दिसून येतो. नव्या पिढीच्या विद्यार्थ्यांना त्यापासून नि:संशयपणे लाभ होईल अशी मी अपेक्षा करतो.
~ डॉ. संजयकुमार करंदीकर,
(महाराजा सयाजीवराव विद्यापीठ, बडोदा)