Description
लोकसंस्कृती ही सर्व संस्कृतींची गंगोत्री असते. संस्कृतीच्या वाक्वळणात बरे-वाईट, उदात्त – अनुदात्त सर्वांची सरमिसळ होत जाते. समाजाचा अर्ध्याहून अधिक भाग असलेल्या स्त्रीजीवनाच्या जडण-घडणीवर या सर्वांचा परिणाम होत असतो. त्यातून स्त्रीमनही आपल्या भाव-भावना, आशा-आकांक्षा, वेदना- विद्रोह व्यक्त करीत असते. वर्तमानातील स्त्री जीवनाची कोडी उलगडताना लोकसांस्कृतिक मायवाटेचा मागोवा स्त्रीच्या स्थिती-गतीवर नवीन प्रकाश टाकतो. लोकसंस्कृती हा केवळ पूर्वज गौरवाचा आणि कौतुकाचा भाग नसून तो समाजसांस्कृतिक चिकित्सेचा विषय आहे. डॉ. तारा भवाळकर अशा प्रकारच्या चिकित्सेच्या वाटा गेली अनेक वर्षे गंभीरपणे शोधीत आहेत. आधुनिक स्त्रीवादी भूमिकेतून घेतलेला हा ‘मायवाटेचा मागोवा’ स्त्रीवादी अभ्यासकांना आणि आम वाचकांना उद्बोधक आणि मनोरंजकही वाटेल.