Description
नव्वदीचा काळ हा गेल्या काही वर्षांत अचानक चर्चेचा विषय झाला असल्याचे अनेकांना जाणवत असेल. असे होण्याची अनेक कारणे आहेत. ‘लिहिता वर्ग’ हाच नेहमी सामाजिक-सांस्कृतिक मनोवस्थेची दिशा आणि प्रकृतीही ठरवत असतो. एक लिहिती पिढी अस्त पावल्यावर दुसरी पिढी लिहू लागते, तेव्हा ती स्वतःच्या नॉस्टॅल्जियाबद्दल लिहू लागते आणि ते साहजिकच आहे. आज चाळिशीत असलेल्या पिढीने ज्यांचे साहित्य, लेख, अनुभवकथन वाचले; ती पिढी आता सत्तरी पार करून गेली आहे किंवा अस्तंगत तरी झालेली आहे.
चाळिशीतील या पिढीने वाचलेला नॉस्टॅल्जिया हा साधारणतः स्वातंत्र्योत्तर काळातला होता. त्याआधी झालेला स्वातंत्र्यलढा आणि त्याही पूर्वीच्या अनेक घटना, व्यक्ती हा आपला नॉस्टॅल्जिया नसून तो आपला इतिहास आहे. आणखी काही पिढ्या गेल्या तरी तो इतिहास सगळ्यांसाठी सारखाच असेल आणि सारखाच महत्त्वाचाही असेल. ‘नव्वदीच्या आगेमागे’ झालेल्या आणि होत असलेल्या अनेक बदलांचा परामर्ष या लेखांमधून जाणतेपणी घेतला गेला. अतिशय रोचक अशी निरीक्षणे नोंदवली गेली. वर्तमानातील तांत्रिक- सामाजिक-आर्थिक सवयींच्या बदलांचा वेग एवढा प्रचंड आहे की वर्षा-दोन वर्षांत हे बदलही कदाचित फार जुने वाटतील. परंतु तरीही त्यांची लेखी नोंद ही या कालखंडाच्या अभ्यासाचा एक भाग म्हणून पुढील अनेक वर्षे महत्त्वाची राहणार आहे. विशेषतः नजीकच्या भूतकाळाचा अभ्यास करण्याची आपल्याला फार सवय नसल्याने या पुस्तकाचे महत्त्व अधिकच जाणवते.
– श्रीकांत बोजेवार