Description
‘पारंपरिक मराठी तमाशा आणि आधुनिक वगनाट्य या पुस्तकात प्रा. विश्वनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रात लोकप्रिय असणाऱ्या तमाशा या लोककला प्रकाराचे पारंपरिक रूप कसे आहे याचा शोध घेऊन आधुनिक काळात त्याचा एक आविष्कार म्हणून अस्तित्वात आलेल्या वगनाट्याच्या स्वरुपाचा शोध घेतला आहे. हा अभ्यास करताना तमासगीरांजवळची जुनी बाडे अत्यंत प्रयत्नपूर्वक मिळवून, त्यांच्या मुलाखती घेऊन विचक्षणपणे त्यांचे प्रयोग पाहून मिळालेल्या सामग्रीचा अत्यंत विवेचकपणे अभ्यासात उपयोग केला आहे. तमाशातील आणि आधुनिक वगनाट्यातील वाङ्मयीन वैशिष्ट्यांचे साधार विश्लेषण या पुस्तकात आहे. कष्टपूर्वक मिळविलेली मुलभूत संशोधन-सामग्री, अभ्यासातून काढलेली यथायोग्य अनुमाने, प्रतिपादनातील तर्कशुद्धता व स्पष्टपणा, निवेदनातील सहज स्वाभाविकता, विविध कला प्रकारांची यथार्थ समज व चोखंदळ वाङ्मयीन दृष्टिकोन या गुणवैशिष्ट्यांमुळे प्रस्तुत ग्रंथ लोकसाहित्याच्या संशोधनात व अभ्यासात मौलिक भर घालणारा ठरला आहे. बंगालमधील ‘बारोमासा’ या लोकनाट्यशैलीशी नाते सांगणाऱ्या, बाडू चंडिदास या संतांनी लिहिलेल्या ‘श्रीकृष्ण चरित्र’ या ग्रंथातील श्रीकृष्णकथेत आढळणारे ‘बडाई’ नावाचे पात्र महाराष्ट्रातील तमाशात ‘मावशी’ म्हणून कसे विकसित झाले याचा वैशिष्ट्यपूर्ण शोध प्रस्तुत ग्रंथात घेतला आहे.