Description
पुरुष’ नावाच्या समाजात मोठ्या व्यापक घटकांचे कोणते रूप मी पाहिले? माझ्या लक्षात येत गेले की स्त्रीला पुरुष आजोबा, वडील, काका, मामा, आत्याचा नवरा, मावशीचा नवरा, भाऊ, सहकारी किंवा अगदी अनोळखी पुरुष असा दिसतो. पण यातल्या कोणत्याही नात्याच्या पुरुषाची स्त्रीकडे पाहण्याची दृष्टी मात्र ती ‘स्त्री’ आहे अशीच असते. तिचे त्याच्या मते, स्थान नेहमीच त्याच्याहून खालच्या दर्जाचे असते. तिला आपल्या धाकात ठेवणे, पुरुषाहून तिला कमी लेखणे, तिला पुरुषापेक्षा जगाचे, व्यवहाराचे ज्ञान कमी आहे, एकूण समज कमी आहे असे मानणे अशी त्याला लहानपणापासून सवय लागलेली आहे. विशेषतः मी ज्या मध्यमवर्गात वाढले आणि जो मध्यमवर्गीय पुरुष मी अवतीभोवती पाहिला त्याचा स्त्रीविषयक दृष्टिकोन याहून फारसा वेगळा मला आढळला नाही. एकूण सर्व समाजात सत्तेचे राजकारण असतेच, पुरुषही त्याच्या बाहेरच्या जगात अनुभव घेत असतो. त्यामुळे घरातली सत्ता आपल्या हातात आहे असे वाटून घेणे व घरातल्या स्त्रियांना तसे वाटायला लावणे ही त्याची मानसिक गरज असते.