Description
शरावतीच्या कवितेला सुरुवात आणि अंत नसतो. ती एकदमच सुरू होते आणि अचानक संपते. वाचक कवितेचा शेवट शोधू पाहतो तेव्हा कवितेत शिरून केव्हा आरपार निघून जातो हे त्याचं त्यालाही कळत नाही. कविता म्हणजे आपल्याच आयुष्याचा प्रत्येक क्षणी घेतलेला नवा शोध असतो, असा सूर तिच्या कवितेत उमटलेला आहे. आणखी एक असंही जाणवतं की, तिच्या कवितेत चित्राबरोबरच एक स्वर आहे. तो तिचा अंतःस्वर आहे. हा स्वर तिनं प्राणपणानं जपलेला आहे. आयुष्यात येणारे भोग भोगताना जी अपरिहार्यता असते, ती ह्या कवितेनं सहज स्वीकारलेली आहे. आपल्या दुःखांचा टाहो तिनं फोडलेला नाही किंवा आक्रोशही केलेला नाही. तिनं आपल्या वेदना केवळ चित्राचे काही फटकारे मारावेत, तशा शब्दांमधून मांडलेल्या आहेत. सुख-दुःख आणि आनंद-वेदना यांच्या पलीकडे जाऊन स्वतःच्या जगण्याचं दर्शन घेणारी कविता असं शरावतीच्या कवितेविषयी मला म्हणावंसं वाटतं.