Description
मराठी कथा साहित्याचा अभ्यास केल्यास लक्षात येतं की महानगरी संवेदना लिहिणारे कथाकार तुलनेत कमी आहेत. याचे एक कारण असे की महानगरी संवेदना कथेत आणताना मुळातच रुक्ष असलेले कथाविषय, कथाप्रदेश आणि कथापात्रे कथेत त्यांची त्यांची रुक्ष आणि असंवेदनशील वृत्ती घेऊन येतात त्यामुळे कथा अधिकच कोरडी होण्याची, वाटण्याची शक्यता दाटते. महानगरी जगणेच मुळात विस्कळीत आहे. तो अव्याहत विस्कळीतपणा, निर्दयी वेग, स्थलकालाचे जीर्ण तुकडे, आणि माणसाचे रोज दररोज नव्याने तुकड्यातुकड्यात होणारे खच्चीकरण अवमूल्यनाने कथेचा आवेग आणि परिप्रेक्ष्य इतका वाढतो की आकलनस्तरावर महानगरी कथा विस्कळीत वाटण्याचा धोका संभवतो. हे सर्व संभाव्य धोके टाळून उदय कुलकर्णी यांची प्रत्येक कथा समकालातील जगण्याचे पेच मांडत वाचकांच्या मनावर पकड घेते ही बाब मला महत्त्वाची वाटते.
उदय कुलकर्णी हे साहित्यासोबत, नाटक आणि चित्रपट यांतही अभ्यासपूर्ण रुची घेतात. त्यामुळेच त्यांच्या कथांमध्ये दृश्यात्मकता जाणवते. महानगरी कथेचे वास्तव मांडताना जो तटस्थपणा लागतो, आणि समोर आलेले निष्कर्ष निडरपणे कागदावर मांडण्यास जी निर्भीड वृती लागते ती उदय कुलकर्णी यांचेकडे आहे. त्यांची कथा असामाजिकतेवर नुसते भाष्य करीत नाही तर प्रश्न विचारण्याची धमक ठेवते.
अशा थेट भाष्य करणाऱ्या कथा आणि कथाकार ही आजच्या काळाची गरज आहे. सूक्ष्मदर्शी भिंगातून महानगरी जगणे दाखवणारे नवे कथाकार उदय कुलकर्णी यांचे वाचक स्वागत करतील हे निश्चित.
– किरण येले