Dilip Purushottam Chitre | दिलीप पुरुषोत्तम चित्रे

Dilip Purushottam Chitre | दिलीप पुरुषोत्तम चित्रे

दिलीप पुरुषोत्तम चित्रे (Dilip Purushottam Chitre) यांचा जन्म बडोदा येथे अभिरुची नियतकालिक चालविणार्‍या  पुरुषोत्तम चित्र्यांच्या घराण्यात झाला.  प्राथमिक शिक्षण बडोदा येथे झाले. १९५१ पासून चित्र्यांचे वास्तव्य मुंबईत होते. पुढे रुईया महाविद्यालयामधून १९५८ मध्ये कला शाखेतील पदवी शिक्षण पूर्ण केले. १९६० ते १९६३ ह्या काळात इथियोपियात नोकरी केली. १९६४ मध्ये मुंबईला परतल्यावर जाहिरात क्षेत्रात नोकरी आणि पत्रकारिता करीत, माध्यमांच्या विश्वात वावरले.

‘अ‍ॅन अ‍ॅन्थॉलॉजी ऑफ मराठी पोएट्री’ (१९६७), ‘आर्फियस’ (१९६८) हा कथा संग्रह; ‘शिबा राणीच्या शोधात’ (१९७१) आत्मचरित्रात्मक प्रवासवर्णन लिहिले. ‘आधुनिक कवितेला सात छेद’ या नावाने रॅम्बो, हॉपकिन्स, रिल्के, एझरा पाउंड, हार्ट क्रेन आदी कवींच्या काव्यविश्वाचा मराठी वाचकांना परिचय करून देणारी त्यांची लेखमाला सत्यकथेतून प्रसिद्ध झाली. क्वेस्ट, न्यू क्वेस्ट, इंडियन एक्सप्रेस, टाइम्स ऑफ इंडिया, थॉट, सेमिनार, इलस्ट्रेटेड वीकली अशा नियतकालिकांतून त्यांनी राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर इंग्रजीत भरपूर स्फुट लेखन केले. ‘चाव्या’ (१९८२), ‘तिरकस आणि चौकस’ (१९९०), ‘शतकाचा संधिकाल’ ही चित्र्यांची सामाजिक आणि राजकीय स्थिती-गतीवरील भाष्ये आहेत. ‘मिठू मिठू पोपट’ (१९८९), ‘सुतक’ (१९८९) ही त्यांची नाटके आहे. ‘चतुरंग’ (१९९५) हे चार लघुकादंबर्‍यांचे संकलन आहे. चित्रकलेविषयी भरपूर लेखन आणि ‘गोदाम’ (१९७८) या चित्रपटाचे कथालेखन-दिग्दर्शन व संगीत दिग्दर्शनही त्यांनी केलेले आहे. चित्र्यांनी पुढील काळात ज्ञानेश्वरांच्या अमृतानुभवाचा अनुवाद केला आणि ‘पुन्हा तुकाराम’ (१९९०) तसेच ‘सेज तुका’ असे मराठी-इंग्रजी भाषांतून त्यांनी तुकारामांच्या कवितेचे मर्म उलगडून दाखविले.

सौजन्य: https://maharashtranayak.in/caitarae-dailaipa-paurausaotatama

Books By Dilip Purushottam Chitre | दिलीप पुरुषोत्तम चित्रे