Description
स्त्री पुरुष नात्यातील विसंवाद जास्त तीव्र होण्याचं एक कारण म्हणजे ती सक्तीनं एकत्र राहात असतात आणि सक्तीनं तुम्ही लोकं एकत्र ठेवली आणि त्यात विसंवाद असला तर तो विसंवाद तुम्ही थोडेसे वेगळे राहिलात, एकमेकांमध्ये थोडीशी स्पेस ठेवलीत तर एकवेळ जाणवणार नाही. पण विसंवादी गोष्टी जेवढ्या एकत्र आणल्यात, त्या तशा एकमेकांच्या ‘फोर्स फिल्ड’ मधे येतील, एकमेकांच्या जवळ येतील, तितका एकमेकांमधला विसंवाद वाढत जाईल. एका पॉईंटला त्याचा विस्फोट होईल. एकत्र राहणं आणि अनिच्छित घर्षण होत राहणं या दोन गोष्टी वेगळ्या आहेत.
आपल्याकडील बहुतेक नाती ही अनिच्छित घर्षणांची उदाहरणं आहेत, असं मला वाटतं. म्हणजे अनिच्छित घर्षण आणि ईच्छित घर्षण असे दोन प्रकार आपण केले तर अनिच्छित घर्षण हे जास्त प्रमाणावर आहे असं आपल्याला आढळून येईल. या विसंवादामुळे कटकटी निर्माण होतात. त्याचा बळी त्यांची मुलं जातात. त्या मुलांचे भावी संबंध असतात स्त्रीपुरुषांशी, इतरांशी, सामाजिक संबंध असतात. एकदा एक स्त्रीपुरुष संबंध नासला की त्याचे दुष्परिणाम हे रेडिएशन प्रमाणे फैलावणारे आहेत किंवा व्हायरसच्या रोगाप्रमाणे वाढतेच आहेत. ते एडस्सारखे पसरत जातील. त्याची लागण, त्याचा संसर्ग हा त्यांच्या नात्यातील सर्व लोकांना होतो. त्यांच्या भोवतालची सर्व नाती सूक्ष्म प्रमाणात बिघडत जातात. आणि सगळा समाज बिघडण्याला व्यक्तींची नाती अशी कारणीभूत ठरतात.