Description
भाषा आणि बोली या व्युत्पत्तीनुसार प्रत्यक्षात समानार्थी असलेल्या शब्दांना वेगळ्या अर्थच्छटा आहेत.
दर दहा कोसांवर भाषा बदलते, या न्यायानेच असंख्य बोली निर्माण झालेल्या दिसतात. बोली टिकल्या तर भाषा टिकतील. कारण बोली हेच भाषेचे प्रत्यक्ष वापराचे रूप असते. बोली ही विशिष्ट समाजाची, प्रदेशाची अभिव्यक्ती असते. त्या त्या प्रदेशातील संस्कृतींचे दर्शन बोलींतूनच घडत असते. प्रमाणभाषेपेक्षा अधिक जिवंत, अधिक रसरशीत असे बोलीचे स्वरूप असते.
मराठी प्रमाणभाषेचा विचार करता अहिराणी, मालवणी, वऱ्हाडी, डांगी, आगरी, वाडवळी अशा विविध बोली आढळतात. प्रमाणभाषेचा अभ्यास करताना या बोलींचाही अभ्यास करणे गरजेचे आहे, हे लक्षात घेऊन मुंबई विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाने २०१७-१८ या शैक्षणिक वर्षापासून मराठीच्या बोलींचा अभ्यास नेमला आहे. आगरी, मालवणी आणि वाडवळी अशा तीन बोलींचा अभ्यास या अभ्यासक्रमासाठी नेमून अभ्यासमंडळाने अतिशय स्तुत्य काम केले आहे. विद्यार्थ्यांना आणि अभ्यासकांना बोलींच्या अभ्यासाच्या दिशेने वळवण्यासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.