Description
कधी गळ्यात रुतलेल्या आवंढ्यात, कधी पदरी पडलेल्या अन्यायात, कधी घरपण अनुभवायला आसुसलेल्या भणंगावस्थेत, कधी आत्यन्तिक विरहात… अस्फुट कविता उगम पावू लागते आणि मन शांत पावण्याआधी तडफडू लागतं. मग तिला विचारांची भूमी गवसू लागते, शब्दांना पाय फुटू लागतात आणि कविता साकारते.” रॉबर्ट फ्रॉस्ट या महान कवींचे हे विधान (शब्दशः नाहीं तर, भावार्थ) मला; सुभाषजी कवितेकडे का वळले असावेत, या प्रश्नाचे उत्तर देण्यास मदत करते. मुलाच्या अकाली जाण्यानंतर सुभाषजींच्या अंतरीचे कल्लोळ कागदावर उमटू लागले. कवितेला जन्म कवी देतो पण कवीचे पुनरुज्जीवन कविताच करते असा हा देवाणघेवाणीचा खेळ, त्यांच्यासोबत देखील सुरू झाला आणि खाला कुठेतरी मोकळे होता आले असावे; हे त्यांच्या कवितेचे खरे भः कारण प्रवाहित तर व्हावे लागतेच, गोठून थांबणे कितीही सहज स्वाभाविक असले तरी. सुभाषजींची कविता ही अशी आहे. त्यांचा एक गुण असा (जो की दुर्मिळच आजच्या काळात) त्यांच्याकडे त्यांच्या कवितेवरील टिका-टिपण्णी शांतपणे ऐकण्याचा संयम आहे. अभ्यासाची दिशा दिली, की तो करण्याचा मानस आहे. आणि तरी काही लगेच जमले नाही की सारे हसत खेळत नेण्याचा, पुढच्या वेळी जमवून बघतो म्हणण्याचा खिलाडूपणादेखील. सुभाषजींना प्रेमकवितांनी भुरळ घातली, यात मला नवल वाटत नाही. तो तर लोकप्रिय राजमार्ग आहेच कवितेकडे वळण्याचा. पण आता ही वाट जेव्हा त्यांना सुकर वाटू लागली आहे तेव्हा त्यांना कवितेकडे अधिक गंभीरपणे बघणे भाग पडू लागेल, अशी आशा मला वाटू लागली आहे. – मनिषा कोरडे