Description
मराठी साहित्याच्या वाटचालीतील सकस प्रवाह म्हणून ग्रामीण साहित्य व दलित साहित्याचा उल्लेख केला जातो. या दोन्ही प्रवाहांमधील साहित्याविषयीची चर्चा आजवर अनेकांनी केली आहे. नंतरच्या काळात या साहित्य प्रवाहांविषयीचे चिंतन करून त्याविषयीची आपली टोकदार भूमिका सातत्याने व्यासपीठावरून आणि लेखनातून मांडण्याचे काम डॉ. प्रल्हाद लुलेकर यांनी केले आहे.
दलित साहित्याच्या प्रेरणा व स्वरुपाची चर्चा, महात्मा फुले यांच्या लेखना विषयीचे चिंतन प्रकट करताना डॉ. लुलेकर मुळातून शोध घेण्याचा प्रयत्न करताना आढळतात. त्यांच्या लेखनाची धार त्यांच्या विचारप्रवृत्तीची साक्ष ठरते. सामाजिक विषमतेविरुध्द पुकारला गेलेला लढा आणि त्यासाठी परिवर्तनशील साहित्याने दिलेले बळ कोणत्या स्वरुपाचे आहे यांचा शोध घेणारी ही मांडणी आहे. तापलेल्या लोखंडावर घण घालून अवजारांची निर्मिती होते आणि बुरसटलेल्या विचारांवर आघात करून नवी परिवर्तनाची दिशा शोधता येते. हे घाव घालणे म्हणजे एका परीने भंजनाचीच प्रक्रिया आहे. पण भंजनाच्या पाठीमागेही भूमिका असते ती नवनिर्मितीची. शोषण मुक्तीचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न साकारण्यासाठी कटिबध्द झालेल्या साहित्याविषयीचे हे भजन नवसमाज निर्मितीची आळवणी करणारे आहे यात शंका असण्याचे कारण नाही. – डॉ. नागनाथ कोत्तापल्ले