Description
रंगनाथ पठारे यांच्या कथनात्मक गद्यात ‘चक्रव्यूह’ ह्या कादंबरीला मी मध्यवर्ती स्थान देतो, ते ती खऱ्या अर्थाने प्रायोगिक आहे म्हणून; तसेच ती आपल्या संस्कृतीच्या सांप्रतच्या कोंडीत झालेल्या एका वैज्ञानिकाच्या शोकिांतिकेची वैयक्तिक आणि सामूहिक व्यवहारांच्या संदर्भात मांडणी करते म्हणून.
या शोकांतिकेचा नायक सक्सेना हा परमाणू – विज्ञानात संशोधन करणारा आहे आणि त्याच्या ऊर्जेचा अविष्कार आणि लोप सुद्धा एखाद्या परमाणूच्या अस्तित्वासारखा भंगुर आहे. त्याच्या भोवतालचे स्थूल विश्व आपला समाज आणि त्यातल्या उपव्यवस्था आहेत. पण तो स्वतः व्यक्ती म्हणून एका क्वांटुम-विश्वाच्या अनिश्चिततेत भ्रमण करणारे रहस्यमय अस्तित्व आहे, हे रूपक या कादंबरीचे संकल्पनात्मक मूळ आहे.
रंगनाथ पठारे यांनी ‘चक्रव्यूह’ नंतर अनेक वर्षांनी लिहिलेल्या ‘नामुष्कीचे स्वगत’ ह्या कादंबरीत हीच संकल्पना निराळ्या रूपात पुन्हा समर्थपणे अवतरते. ‘चक्रव्यूह’ आणि ‘नामुष्कीचे स्वगत’ यांचा एकत्र विचार केल्यास पठारे यांच्या कथनात्मक गद्याचे आधुनिकत्व समकालीनत्व आणि प्रयोजकत्व ठळकपणे मनावर ठसते. ‘चक्रव्यूह’ ही मराठीतली एक यशस्वी ‘नैतिक रहस्यकथा’ आणि ‘सांस्कृतिक शोकात्मिका’ आहे, असे मी म्हणेन.