Description
लोकसाहित्य म्हणजे केवळ पारंपरिकता, अंधश्रद्धेचे भांडार, अशिक्षितांचे ओबड-धोबड बोल असे म्हणून जर का कोणी लोकसाहित्याला हिणवत असेल तर ते बरे नाही. जगातील कोणत्याही देशाची श्रीमंती जाणून घ्यायची असेल तर ती पैशाने सोन्या नाण्याने नव्हे तर त्या देशातील लोकसाहित्याच्या भरीव कामावरून विचारात घेतली जाते. इतर देशांचा विचार करता बऱ्याच देशांमध्ये स्वतंत्र लोकसाहित्याचा अभ्यास करण्यासाठी लोकसाहित्याची कितीतरी विद्यापीठे स्थापन केली गेली आहेत. आपल्या देशात स्वतंत्र विद्यापीठ तर सोडाच पण साधे विद्यापीठांमध्ये लोकसाहित्याचा पेपर शिकविण्याची मारामार आहे. नियतकालिके आणि दैनिके म्हणावी तसा लोकसाहित्याचा प्रसार करण्यात धजावत नाहीत. लोकसाहित्याचा अभ्यास करणाऱ्या शासकीय आणि निमशासकीय संस्था मृत्यूपंथाला गेल्यात जमा आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाच्या नावाखाली जुने मौल्यवान ज्ञान आपण पायदळी तुडवून त्याची विल्हेवाट तर लावत नाही ना? असे कितीतरी प्रश्न आजच्या काळातील लोकसाहित्याच्या बाबतीत आपल्याला पडल्याशिवाय राहात नाहीत.