Description
प्राचीन जंबुद्वीपाची राजकीय परिस्थिति महाभारतावरून अजमावतां येते, परंतु सामाजिक परिस्थिति त्या ग्रंथावरून. पूर्णपणे लक्षांत येत नाही. महाभारत व रामायण हे ग्रंथ राजे व ऋषी यांच्या गोष्टी सांगतात व नगरादिकांची वर्णनें अतिशयोक्तिपूर्ण भडक रंगात देतात. जातक हा त्याच काळांत घडत असलेला ग्रंथ मध्यम व कनिष्ठ वर्गांची माहिती देतो.
प्राचीन जंबुद्वीपांतील लमाणांदी व्यापार करणारे फिरते व्यापारी, द्यूत खेळून निर्वाह करणारे जुगारी, दारूचे दुकानदार मेरी (ढोलगे) वाले, संघानें काम करणारे बढई, फासेपारधी, कोळी, शेती व शिकार करणारे ब्राम्हण, धंदेवाईक गवई, कपाळकरंटे पुत्र, नावाडी, चांडाल, अशा भिन्न व्यवसायांच्या कनिष्ट वर्गाचें; त्याच प्रमाणे अनाथपिंडिकासारखे श्रीमंत व्यापारी ज्यांत आहेत अशा मध्यम वर्गाचें प्रतिबिंब जातकांत दिसते. त्या वेळीं लोकांचे खाणेपिणें कसें असे, त्यांच्या चाली कशा होत्या, कोणत्या भोळ्या समजुती प्रचलित होत्या, त्यांचा पोषाक कसा होता, त्यांस व्यसने कोणती होती हे सर्व एक तऱ्हेच्या स्वाभाविक व जिवंत भाषेत आपल्या पुढें जातकाच्या रूपानें मांडून ठेविलेले आहे. संस्कृत ग्रंथांची कृत्रिमता यांत नाही. स्वाभाविकपणा हा जातकांतील संभाषणात आपल्याला कसा मूर्तिमंत दिसून येतो.