Description
सांगनं नही पन सांगनं वनं हे डॉ. दिलीप धोंडगे यांचे अहिराणी भाषेतील पहिलेच ललितगद्य लेखन आहे. ते मोहक तर आहेच; पण भावकल्लोळ निर्माण करणारे शक्तिमान कथन आहे. या लेखनात ‘सांगणे’ ही क्रिया अतिशय उत्फुल्ल बनलेली आहे. सांगितल्याशिवाय राहवत नाही, गोष्ट पोटात ठेवता येत नाही अशी अपरिहार्य कथानात्मता या लेखनाला लाभलेली आहे. सांगणाऱ्याची अधीरता ऐकणाऱ्यामध्येही निर्माण होते. सांगणारा ऐकणाऱ्याला सारखा आपल्या बरोबर घेतो. सांगण्याचा ओघ अखंड आहे. माणसांबद्दलचे, गुराढोरांबद्दलचे, शेताबद्दलचे, शाळेबद्दलचे, मित्रांबद्दलचे, नात्यातले आणि नाते निर्माण झालेल्या असे कोणाही बद्दलचे ‘स्व’ चे आकलन आहे.
या लेखनाचे प्रकट वाचन अत्यंत आनंददायी व अहिराणी बोलीरूपाचा प्रत्यय देणारे घडू शकते. त्यात खेड्यातले नाट्य, हास्य, सुखदुःख आहे. जगणे, बहरणे, मोडून पडणे आणि परिस्थितीशी सामना करीत पुन्हा उभे राहणे आहे. या साऱ्या सांगण्यातले नाट्य उभे करणारा निवेदक संयतपणे, समंजसपणे खेड्याकडे पाहतो. स्वतःला प्रकट करताना अहिराणी प्रदेशातील संस्कृतिरूपांना ‘स्व’मध्ये सामावून घेतो. मुले माणसे, प्राणी, शेती- माती या सर्वामध्ये स्वतःला विसर्जित करतो. सर्जनशीलतेचा देशी प्रत्यय देतो. हे लेखन वाचल्यावर हे सारे सांगण्यालायक, सांगण्यासारखे आणि ऐकण्यासारखे आहे. अहिराणी भाषेचे पांग फेडणारे हे पहिलेच समर्थ व स्वाभाविक गद्य आहे.