Description
वाढत्या झाडाला नियमित नवी पालवी फुटत असते अन् त्याच्या आधीची अनेक पाने पिवळी होऊन झडतच असतात. ती आपल्या जागेवरून निसटत असतात; तशी ही माझ्या जगण्याच्या संचिताच्या झाडाची काही निसटलेली पाने. ‘सकाळ’ वृत्तपत्राच्या ‘सप्तरंग’ पुरवणीसाठी लिहिलेली. पुष्कळांना मी लेखक आहे हे यांजमुळे समजले इतकी लोकप्रियता या लेखांना लाभली. त्यामुळे तोवरचे आपले लेखन निरर्थकच होते असे कित्येकदा माझ्या मनात येऊन गेलेले आहे. आपल्या वाचनसंस्कृतीचा पल्ला कुठवर जातो याचे ते द्योतक आहे हे सरळच. काही मित्रांविषयी, अनुभवांविषयी लिहिलेले यात भर म्हणून घातले आहे. ते त्याला वेगळी जागा दिसत नसल्याने. त्यामुळे ही सगळीच निसटलेली पाने नसली तरी एकुणात ‘निसटलेली पाने’ च होत असे म्हणायचे.