किरण येले हे मराठी कवी, कथाकार आणि नाटककार. दूरचित्रवाणीसाठीही त्यांनी लेखन केले आहे. १९९७ पासून ते ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथे राहतात. आपली कविता मुळात सामाजिक आहे, असे ते सांगतात. ‘चौथ्यांच्या कविता’ (२०००) या त्यांच्या पहिल्या संग्रहातील ‘आम्ही चिल्लर’ या कवितेने त्यांना प्रथम ओळख मिळवून दिली.
कवी म्हणून त्यांना प्रस्थापित केले ते ‘बाईच्या कविता’ (ग्रंथाली, २०१०) या संग्रहाने. एका दुपारी झोपेतून उठलेल्या आईला कपाळावरची टिकली हरवल्याचे लक्षात आले आणि ती कासावीस होऊन ती शोधू लागली. ते पाहताना पहिली कविता सुचली, असे ते सांगतात. कवी शंकर वैद्य यांनी या पुस्तकाला ‘स्त्रीसूक्त’ म्हटले. त्याचा पुढचा भाग ‘बाई बाई गोष्ट सांग’ डिसेंबर २०२४ मध्ये आला. ‘मोराची बायको’ (ग्रंथाली, २०१८) या त्यांच्या कथासंग्रहाची दुसरी आवृत्ती त्याच वर्षी निघाली आणि २०१९ पासून त्यातील शीर्षककथा मुंबई विद्यापीठाच्या बी.ए. मराठीच्या पहिल्या वर्षाच्या अभ्यासक्रमात आहे. ‘तिसरा डुळा’ (ग्रंथाली, २०१९) मध्ये थकलेल्या आणि इतरांनी संपवू पाहिलेल्या माणसांच्या गोष्टी आहेत.
‘प्लॅटफॉर्म नंबर ९’ आणि ‘बाई, आमिबा आणि स्टील ग्लास’ ही त्यांची नाटके. २०१९ पर्यंत त्यांची तीन नाटके व्यावसायिक रंगभूमीवर आली होती. अमेरिकेतील महाराष्ट्र फाउंडेशनने २०२० मध्ये ‘तिसरा डुळा’ला ललित ग्रंथ पुरस्कार दिला. त्याआधी डॉ. अनंत लाभसेटवार फाउंडेशनचा साहित्य पुरस्कार आणि मुंबई मराठी साहित्य संघाचा कथाकार शांताराम पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.