नीरजा या मराठी कवयित्री, कथालेखिका, ललितलेखिका आणि कादंबरीकार आहेत. समकालीन मराठी कवितेत स्त्रीअनुभव मांडणाऱ्या सर्वांत स्पष्ट आवाजांपैकी त्या एक. त्यांचा जन्म २३ ऑक्टोबर १९६० रोजी झाला. समीक्षक मधुकर पाटील आणि विभावरी पाटील यांच्या त्या कन्या. विवेकवादी घरात त्या वाढल्या. इंग्रजी विषयात एम.ए. केल्यानंतर त्यांनी सुमारे पस्तीस वर्षे कनिष्ठ महाविद्यालयांत इंग्रजीचे अध्यापन केले. त्या केवळ आपल्या पहिल्या नावानेच लिहितात.
महाविद्यालयीन काळात त्यांची कविता सुरू झाली. ६० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात नवोदित कवींच्या मंचावर “सावित्री” ही कविता वाचून त्या प्रथम रसिकांसमोर आल्या. ‘निरन्वय’ या पहिल्या संग्रहानंतर ‘वेणा’, ‘स्त्रीगणेशा’, ‘निरर्थकाचे पक्षी’, ‘मी माझ्या थारोळ्यात’ आणि ‘विध्वंसाच्या वेदीवर चढण्याआधी’ हे संग्रह आले. स्त्रीसंवेदना हा त्यांच्या कवितेचा गाभा असला तरी ती केवळ पुरुषांविरुद्ध नव्हे, तर परंपरावादी विचारसरणीविरुद्ध उभी राहते. ‘जे दर्पणी बिंबले’, ‘ओल हरवलेली माती’, ‘पावसात सूर्य शोधणारी माणसं’ आणि ‘अस्वस्थ मी, अशांत मी’ हे त्यांचे कथासंग्रह. ‘थिजलेल्या काळाचे अवशेष’ या पहिल्या कादंबरीत १९८० च्या दशकातील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील मित्रमंडळ तीस वर्षांनंतर पुन्हा भेटते.
‘निरर्थकाचे पक्षी’ला केशवराव कोठावळे पुरस्कार (२०११) आणि महाराष्ट्र शासनाचा कवी केशवसुत पुरस्कार मिळाला, तर कादंबरीला २०२३ चा लोकमत साहित्य पुरस्कार. फोंडा येथील ९ व्या गोमंतक महिला साहित्य संमेलनाचे (२०११), कल्याण येथील ४४ व्या महानगरी साहित्य संमेलनाचे (२०१९) आणि सावंतवाडी येथील पहिल्या सिंधुदुर्ग जिल्हा साहित्य संमेलनाचे (२०२५) अध्यक्षपद त्यांनी भूषवले.