Description

भारतीय ‘ग्राम’ रचना ऋग्वेदाच्या पुरुषसूक्तातील समाजपुरुषांच्या संकल्पनेप्रमाणे आहे. या संकल्पनेप्रमाणे मुखापासून निर्माण झालेले ब्राह्मण बांधव, बाहूपासून निर्माण झालेले क्षत्रिय बांधव, पोटापासून निर्माण झालेले वैश्य बांधव आणि पायापासून निर्माण झालेले शूद्र बांधवच गावात राहतात. मुखापासून पायापर्यंत जे निर्माण झाले, तो समाजपुरुष म्हणजे ‘गाव’. अस्पृश्य, आदिवासी आणि भटके-विमुक्त यांचा या समाजपुरुषाच्या संकल्पनेत समावेशच नाही. म्हणून त्यांना ‘गावा’त स्थान नाही. त्यांना ‘गावा’बाहेर बहिष्कृत करण्यात आले. हाच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘बहिष्कृत भारत’ होय. या समाजव्यवस्थेने बहिष्कृतांना ज्ञानसत्ता, राजसत्ता, अर्थसत्ता आणि सन्मान यापासून वंचित ठेवले. त्यांना काळोखाचे वाटप केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर नावाचा प्रज्ञासूर्य उगवला. त्याने सर्वांना उजेडाचे वाटप केले. राज्यघटनेत कल्याणारी तरतुदी करून ज्ञानाचा उजेड त्यांच्यापर्यंत नेला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर नसते, तर अस्पृश्यांच्या हातचा झाडू जाऊन हाती खडू आला नसता. आदिवासींच्या हातातील तीरकमठा जाऊन त्यांच्या हाती लेखणी आली नसती. डॉ. बाबासाहेबांनी नवे भान दिले, त्या प्रेरणेतून दलित साहित्य जन्माला आले. आदिवासीच्या समस्या, त्यासाठी चाललेला संघर्ष आणि त्यातून निर्माण होणारे साहित्य यांचा अनुबंध जमीन, जंगल आणि जल यांच्याशी आहे. आदिवासींच्या दैन्य, दुःख, दास्यं आणि दारिद्र्याच्या वेदना आणि विद्रोहाचे, आदिवासींचे अस्तित्व आणि अस्मिता यासाठी चाललेले संघर्षाचे सम्यक आणि भेदक दर्शन म्हणून आदिवासी साहित्य होय. आपल्या शोषणकर्त्याची टेहळणी करीत, शब्दांची शस्त्रे करून अन्याय-अत्याचाराविरुध्द उठवलेला बुलंद आणि बलदंड आवाज म्हणून आदिवासी साहित्य होय. मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी ‘रायटिंग फॉर फायटिंग’ ही आंबेडकरवादाची गर्जना या साहित्यात ऐकायला येते. या लढाऊ साहित्यांच्या विविध विलोभनीय रूपरंगाचा, आदिवासी समाजाच्या साहित्य, कला आणि संस्कृतीचा; त्यांच्या निसर्गाशी असलेल्या भावपूर्ण नात्याचा अभ्यासपूर्ण, चिकित्सक वेध या ग्रंथात घेण्यात आला आहे. अभ्यासकांना हा ग्रंथ म्हणजे एक अमोल ठेवा आहे,

Additional information

Book Author