Description

काय वाचाल अक्षरलिपी दिवाळी विशेषांक २०२३ मध्ये...                                                                                                                                              माणसांनी माणसांच्या सांगितलेल्या माणूसकीच्या व जगण्याच्या गोष्टी घेऊन आला आहे यंदाचा, ‘अक्षरलिपी’ दिवाळी विशेषांक. जाणत्या लेखकांचं विचारमंथन, नव्या लेखकांची अक्षरभरारी, त्यांनी घेतलेला माणसांचा शोध-बोध आणि अनवट विषयांवरील निःपक्ष भाष्य यातून ही ‘अक्षरलिपी’ रंगली आहे. साहित्य आणि समाजभान जागवणारं वसंत आबाजी डहाके यांचं मुक्तचिंतन, सत्याचा आरसा दाखवणारं साहिल कबीर यांचं कथन, शब्दालय प्रकाशनाच्या सुमती लांडे यांच्यासाठी श्रीकांत देशमुख यांनी विणलेला शब्दांचा तानाबाना आणि चौकटीबाहेरचे चित्र-रंग शोधणाऱ्या अन्वर हुसैन यांच्याशी प्रतिक पुरी यांनी केलेली खुमासदार बातचीत, सारंच वाचनीय आहे. सोबतीला आहे मंगोलियाच्या चौखूर साम्राज्याचा मिलिंद बोकील यांनी घेतलेला शोध आणि तीन जगांवरील पावसांचा सुकल्प कारंजेकर यांनी घेतलेला वेध.
स्त्रीकेंद्रित शेतीच्या झहिराबादी प्रयोगाविषयी रेणूका कल्पना, तर शेतीत रमलेल्या लेखकाविषयी सांगत आहेत हृषीकेश पाळंदे. सोबतच अजय कांडर, मिलिंद सुधाकर जोशी आणि गणेश मनोहर कुलकर्णी यांचे आगळे-वेगळे लेख. डॉ. ऐश्वर्या रेवडकर, प्रसाद कुमठेकर आणि किरण क्षीरसागर यांच्या खणखणीत कथांसोबत जयप्रकाश सावंत यांची अनुवादित कथाही या अंकात आहे. अनिल साबळे व सॅबी परेरा यांनी त्यांना भेटलेल्या अतरंगी माणसांच्या गोष्टी लिहिल्या आहेत, तर कल्पना दुधाळ व माधवी भट यांनी जगण्याची चित्रपेर केली आहे. प्रज्ञा दया पवार, सिसिलिया कार्व्हालो, प्रमोद मनोहर कोपर्डे, पांडुरंग सुतार या ज्येष्ठांसोबत नव्या दमाच्या कवी-कवयित्रींच्या कवितांनी अंक बहरला आहे.
अंधारातही आशेची ज्योत तेवत ठेवणाऱ्या ‘अक्षरलिपी’च्या संपादनाची धुरा मनोहर सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली महेंद्र मुंजाळ, शर्मिष्ठा भोसले आणि प्रतिक पुरी यांनी सांभाळली आहे. अंकाचं अर्थवाही मुखपृष्ठ अन्वर हुसैन यांचं, तर मांडणी संदीप साळुंके यांची आहे. आपल्या भवतालाची कथा सांगणाऱ्या ‘अक्षरलिपी’च्या शब्दप्रवासाचे सहयात्री होण्यासाठी तुम्हा सर्वांना सस्नेह आमंत्रण.