Description
स्त्री, तिचं दुःख, निमूटपणे सारं सोसणं, विशाल करुणा हा रंगनाथ पठारे यांच्या कथालेखनप्रकृतीचा एक प्रमुख विषय आहे. त्याशिवाय भोवतालच्या सामाजिक जीवनाचं त्यांना चांगलं भान आहे, आणि त्यांच्या लेखनात ही पक्व सामाजिक जाणीवही व्यक्त झालेली आहे. ‘गाभ्यातील प्रकाश’ या कथासंग्रहातून ही सर्वच वैशिष्ट्ये ठळकपणे जाणवतात. या संग्रहातील ‘दुसरी निष्पत्ती’ या कथेतून मानवी संस्कृतीच्या विकासाच्या टप्प्यात स्त्रीवर पुरुषांनी गुलामगिरी कशी लादली याचं प्रत्ययकारी दर्शन ते घडवतात. ‘पाषाणातील वीज’ या कथेतून प्रौढ, एकाकी स्त्रीच्या वेदनेचा ते वेध घेतात; तर ‘गाभ्यातील प्रकाश’ या कथेतून स्त्री-पुरुषनात्याचा शोध पठारे एका वेगळ्याच पातळीवरून घेतात. त्यांच्या या संग्रहातील कथांमध्ये काही सूत्रे मूलभूत आहेत. आत्मशोध आणि जीवनमूल्यांची जाणीव पठारे यांच्या सर्वच लेखनातून आढळत असल्याने हे लेखन उपरं, वरवरचं वाटत नाही. त्यामुळे ‘गाभ्यातील प्रकाश’ हा कथासंग्रह ही रंगनाथ पठारे यांच्या वाङ्मयीन वाटचालीतील लक्षणीय भर आहे, हे निश्चित.
– सु. रा. चुनेकर