Description
“मम्मी, मम्मी तिकडे बघ आग लागलीय!” नदीकाठच्या स्मशानात कुणाचं तरी प्रेत जळत होतं. त्याच्या लाल केसरी ज्वाळा हवेत उसळल्या होत्या. मी तिला म्हटलं बेटा आग नाही लागली माणूस मेला की त्याच प्रेत स्मशानात आणून जाळतात !”
मग त्या माणसाला चटके बसत असतील ना? ‘तो रडत असेल ना?’
केवढा निरागस प्रश्न त्या चिमण्या जिवाचा. जिला अजून दुनिया बघायची, जिला मृत्यू काय, जगणं काय हेच माहीत नाही ती केवळ प्रेताच्या वेदनेने व्याकूळ होऊन मला आगीच्या दाहकतेबद्दल विचारत होती. तिच्या या प्रश्नाने मी खाडकन भानावर आले. मी काय करायला निघाले होते. माझ्या जिवाचं बरं-वाईट करणं ठीक होतं. पण या निष्पाप जीवाचं आयुष्य संपवण्याचा मला काय अधिकार होता? म्हणजे एकाच वेळी मी आत्महत्या आणि एक अश्राप जीवाचा खून करायला निघाले होते. आवेगाने मी पिल्लाला पोटाशी धरलं डोळ्यातले अश्रू पावसाच्या पाण्यात मिसळत असताना मी तिला घेऊन नदीवरून माघारी फिरले.