Description
‘गोठण’ या रावजी राठोड यांच्या कादंबरीत एका लढ्याची हकिगत आहे. गोर बंजारा जमातीत तांड्यात जन्मलेल्या एका लढाऊ तरुणाची ही श्रेयहीन गाथा आहे. त्याचा लढा त्याच्या लोकांच्या उत्थानासाठीचा आहे. कुटुंबाच्या अन् तांड्याच्या पातळीवर सतत लढणं, त्यातले गुंते, यश-अपयश, श्रेय मिळणं न मिळणं हे सगळं तर आहेच. पण मला अधिक महत्त्वाचं वाटतं ते गोर बंजारा भाषेचं सांस्कृतिक सौष्ठव; जे या लेखनात ठायी ठायी सहज प्रकट झालेलं आहे. सतत अवमान झेलणाऱ्या, माणूस म्हणूनही नीट मान्यता न मिळालेल्या तांड्यातील माणसांनी आपलं आंतरिक जगणं ज्या अमोल अशा सांस्कृतिक समझदारीनं तेवतं ठेवलं आहे, ते सगळे हेवेदावे, भांडणं, लठ्ठालठ्ठी यांना पुरून उरतं, आपल्या अंतःकरणात निश्चित जागा करतं. राठोड यांनी मराठीत लिहिणं हे मराठीला समृद्धी देणारं आहे. ही समृद्धी भाषिक, सांस्कृतिक अंगानं मराठी वाचकाला श्रीमंत करणारी आहे. दूरून दिसणारी किंवा बव्हंशी अजिबातही न दिसणारी एका मराठी समाजाच्या जगण्यातली धग आपल्या लेखणीनं काहीशा अनघडपणे त्यांनी मराठी साहित्यात आणली आहे. गोर बंजारा भाषेनं मराठीला ही अनमोल अशी भेटच दिलेली आहे. रावजी राठोड आणखी लिहित राहून वाचक म्हणून आपल्याला समृद्धी देत राहतील याची मला खात्री आहे.