Description
‘रहबर’ ही रफीक सूरज यांची पहिली तरिही महत्त्वाची कादंबरी. ‘मी मराठी बोलतो, मराठी दिसतो, मराठी जीवन जगतो. तरी माझे या मातीतील अस्तित्व का नाकारले जात आहे ?… मला इथे परक्या सारखी वागणूक का मिळते आहे ?’ हा या कादंबरीतल्या सलीम मुजावरचा प्रश्न. आपल्या मराठी मुसलमानांचा व व्यापक अर्थाने भारतीय मुसलमानांचा प्रातिनिधिक प्रश्न. ही कादंबरी सलीम, त्याचं कुटुंब, त्याचा गोतावळा, त्याचं गाव, त्याचा प्रदेश, जमात, साहित्य संस्कृती अशा अनेक प्रतलांवर वावरत सुशिक्षित मराठी मुसलमान तरुणाच्या अस्वस्थ तेची, असुरक्षिततेची कहाणी उभी करते. त्याला जाणवणारा काच दुहेरी आणि दुपेडी आहे.. बहुसंख्यांकांच्या प्रभावक्षेत्रातील अल्पसंख्य आणि अल्पसंख्य प्रभावक्षेत्रातील आधुनिक अशा त्याच्या असण्यामुळे तो निर्माण झाला आहे. कादंबरीत आलेली मुसलमानी भाषा-सलीम तिला ‘मुसलमानी’ म्हणतो. खरं तर ती ‘दखनी’ भाषा आहे. उर्दू आणि मराठी यांच्या संकरातून निर्माण झालेली. मराठीची बहीण. एकेकाळी या भाषेत समृध्द वाङ्मय निर्माण झालेलं आहे. आता मुसलमानांच्या बोलीत फक्त उरलीय ती. या लेखनाच्या पर्यावरणाचा अस्सल, अविभाज्य भाग म्हणून ती आलेली आहे व ती सुंदर आहे. सलीमचं मराठीपण त्याच्या सुखदुःखांसकट सहज उभं राहतं. त्याच्या जगण्यातील दहशत, भीती, असुरक्षितता, उखडलं गेल्याची भावना जाणवताना आपल्या मराठीपणाच्या अभिमानाच्या, आपल्या सहिष्णुतेच्या टेंभ्याच्या चिंध्या होतात. त्या शिवल्या जाणं किती निकडीचं आहे, याचा संस्कार आपल्यावर होतो.