Description
डॉ. सुधीर रा. देवरे हे कला, लोकजीवन व लोकवाङ्मयाचे अभ्यासक असून बालपणापासूनच डोंगऱ्या देव, म्हसोबा, आया, रोकडोबा, म्हस्कोबा, पिरोबा, आईभवानी, सप्तश्रृंगी आदी डोंगरकपारीतील लोकदैवते तसेच वीरदेव, मारूती, गौराई, कानबाई – रानबाई, आईमरी, भालदेव, खंडोबा, वेताळ, नाथबोवा आदी ग्रामीण लोकदैवते हे त्यांनी जवळून अनुभवलेले भावविश्व आहे. ‘शक्तिसौष्ठव’, ‘लोकधाटी’, ‘मातावळ’ असे ग्रंथ वाचताना डॉ. सुधीर रा. देवरे यांचे कुतुहल सहाजिकच जागे झाले.
कुठलाही कलाविष्कार किंवा सौंदर्यमूल्य ही स्वायत्त असू शकत नाहीत. काळ, समाज आणि परिवेश यांची ती निर्मिती असते. कला या त्या त्या कालखंडातील अपत्य असतात. निसर्ग आणि कला या परस्परपूरक असतात. किंबहुना कला या निसर्गाच्या अनुकरणातून जन्माला येतात. पंथ, संप्रदाय आणि धर्म यांचाही कलाविष्कारांशी घनीष्ट संबंध येत असतो…
जगण्याचा धर्म आणि कलांचा पोत यांचा एकत्रित विचार केल्याने कलामीमांसा ही अप्रत्यक्षपणे जीवनमीमांसाही ठरते. मराठी समीक्षेतील जीवनवादी दृष्टीकोणाला नैतिकता, बोध, प्रचार यांच्या चौकटीतून मोकळे करून समग्र जीवनाच्या अवकाशात कलांच्या पोताचे दर्शन घेण्याची नवी जाणीव या मीमांसेने दिली, हीच या समीक्षेची सर्वात महत्त्वाची फलश्रुती आहे.
कला आणि संस्कृती यांचा परस्पर संबंध ही मीमांसा तपासून पाहते. कारण कला या माणसांच्या संस्कृतीच्या सारांश म्हणता येतील…
– डॉ. सुधीर रा. देवरे यांच्या दहा वर्षांच्या अथक परिश्रमातून ही ग्रंथनिर्मिती सिद्ध झाली आहे.