Description
मुली आणि मुले वयाने वाढत असताना १० व्या १२ व्या वर्षानंतर त्यांच्या शारिरीक आणि मानसिक अवस्थांमध्ये कधी अचानक तर कधी हळूहळू काही बदल घडायला लागतात. जसे की मुलींच्या छातीचा आकार मोठा होणे, मुलांना काखेमध्ये केस येणे, मुलांना दाढी आणि मिशा येणे इत्यादी. अशा प्रकारच्या गोष्टींमुळे मुली आणि मुले गोंधळून आणि बावरून जातात. या गोष्टी कोणाशी ‘शेअर’ कराव्यात, कोणाला सांगाव्यात हे त्यांना उमजत नाही. आपल्यातल्या या बदलांमुळे अनेकदा या वयातील मुली-मुले अबोल होतात. खरंतर या स्वाभाविक, नैसर्गिक गोष्टी आहेत. हे सर्व कशामुळे होते हे त्यांना समजावून सांगणे अपेक्षित आणि आवश्यक असते. पण असे घडतेच असे नाही.
या पुस्तकात डॉ. मेधा मलोसे आणि डॉ. राजेंद्र मलोसे या उभयतांनी या उमलत्या वयातील मुलींसाठी आणि मुलांसाठी अतिशय सोप्या, सुबोध भाषेमध्ये अनेक उदाहरणे देऊन या गोष्टी समजावून सांगितल्या आहेत. वयात येणाऱ्या प्रत्येक मुलीसाठी व मुलासाठी त्याचप्रमाणे त्यांच्या पालकांसाठीदेखील हे पुस्तक अतिशय मार्गदर्शक ठरेल, अशी खात्री वाटते.