Description

समाज सुसंस्कृत होऊ लागला तेव्हापासून मौखिक वाङ्मयाच्या निर्मितीला प्रारंभ झाला. लोकगीते जशी गायिली जाऊ लागली, तशा कथा सांगितल्या जाऊ लागल्या. लोकजीवनातील नाट्य आकाराला येऊ लागले. लोकसंगीतही आकाराला येऊ लागले. याचा अर्थ असा की, किमान तीन-चार हजार वर्षांपासून लोकवाङ्मय निर्माण होत आहे. आजही वेगवेगळ्या रूपांत लोकवाङ्मय निर्माण होतच आहे. अशा समद्ध वाङ्मय परंपरेचे संकलन आणि संशोधन होणे अतिशय महत्त्वाचे आहे. त्यातून मराठी साहित्यसमीक्षा अधिक समृद्ध होऊ शकते. याचे भान ठेवून प्रा. डॉ. द. के. गंधारे, प्रा.डॉ. तुकाराम रोंगटे आणि प्रा.डॉ.निवृत्ती मिसाळ यांनी ‘लोकसाहित्य: कला आणि संस्कृती’ या ग्रंथाचे संपादन केले आहे. लोकसाहित्याशी संबंधित विषयावर अतिशय अभ्यासपूर्ण लेख या संपादनामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत. लोककला, लोकसाहित्यसमीक्षा, लोकगीते आणि ग्रामदैवते असे विभाग कल्पून येथे करण्यात आलेली लोकसाहित्याची समीक्षा मराठी लोकसाहित्याच्या अभ्यासाला नवी दिशा देणारी ठरेल असा मला विश्वास वाटतो. असा अभिनव ग्रंथ संपादित केल्याबद्दल संपादकांना आणि अभ्यासपूर्ण लेख लिहिल्याबद्दल सहभागी अभ्यासकांना धन्यवाद दिले पाहिजेत. सदर ग्रंथ अभ्यासकांना निश्चितच दिशादर्शक होईल, असा मला विश्वास वाटतो.