Description
आमचे बालपण पूर्वीच्या ठाणे जिल्ह्यातील पालघर तालुक्यातील डोंगराच्या पायथ्याशी वसलेल्या ‘नेटाळी’ या गावी गेले. या गावातले आमचे मित्र, मैत्रिणी म्हणजे वारली, मल्हार कोळी, ठाकर या आदिवासींच्या जमातीमधील आहेत. आम्ही शाळेतून, महाविद्यालयातून आल्यानंतरचे आमचे जग म्हणजे जंगलात, शेतात काम करणाऱ्या आदिवासी काका-काकू, दादा-बाय यांच्याबरोबर मजा- मस्करी, काम करण्यात जात असे. रात्री आम्हाला आमचे वडील उत्कृष्ट गोष्टी ऐकवत असत. लाडक्या काका भुताच्या गोष्टी सांगत असे. त्यामुळेच मला कथेचा छंद जडला. या काळात आम्ही भावंडे आदिवासींच्या सांस्कृतिक, सामाजिक रूपात एकरूप झालो.
पदव्युत्तर संशोधनासाठी मी ‘ठाणे जिल्ह्यातील आदिवासींचे लोकसाहित्य संकलन व तुलनात्मक अभ्यास’ या विषयावर अभ्यास करण्यास सुरुवात केली. माझी बहीण मीनाक्षी सामंत हिनेसुद्धा संशोधनासाठी आदिवासी लोककथांच्या संकलनाला सुरुवात केली. या काळात आम्ही झपाटल्याप्रमाणे काम केले. आणि लोकसाहित्याचे प्रमाणाच्या बाहेर संकलन केले. त्याची पुन्हा नव्या अभ्यास पद्धतींनी मांडणी केली आणि ‘आदिवासी लोककथामीमांसा’ या ग्रंथाचे लेखन केले आहे. या ग्रंथात आदिवासी लोककथांचा अभ्यास करताना मानसशास्त्रीय पद्धती, आदिबंधात्मक पद्धती आणि कथनमीमांसा यांचे उपयोजन केले आहे.