Description
अशोक कौतिक कोळी यांच्या ‘पाडा” ह्या कादंबरीत चांगदेव तापीकर नावाच्या खान्देशातील एका छोट्या केळी उत्पादक शेतकऱ्याच्या आयुष्याची कहाणी आहे. आपल्या कृषिप्रधान ग्रामीण अर्थव्यवस्थेत सध्याचे शेतकरी जीवन विजेची अनियमितता, शेतीमालास मिळणाऱ्या भावाची अनिश्चितता, संधीसाधू राजकारण आणि भ्रष्टाचार अशा प्रश्नांनी व्यापलेले आहे. या.. प्रश्नांनी निर्माण केलेल्या परिस्थितीच्या भोवऱ्यात सापडलेला चांगदेव तापीकर आपल्या कुटुंबाला सावरत केळी उत्पादक शेतकऱ्यांची संघटना बांधण्याचे स्वप्न पाहतो. आपल्या निष्ठांसाठी सर्वस्व पणाला लावून तडजोड नाकारतो. शेती आणि शेतकरी यांच्या भावजीवनाचे मनो निवेदन करीत करीत त्याची ही कहाणी हळूहळू विस्तारत जाऊन कुटुंबप्रमुख आणि शेतकरी कार्यकर्ता या भूमिकांमधील अंतर्विरोधाचा त्याला होणारा जीवघेणा ताण, त्याची अंतर्बाह्य होरपळ, लबाडी, दांभिकता व फसवेगिरीचा उदोउदो, अस्सलपणाचा होणारा तेजोभंग इत्यादी गोष्टींना कवेत घेत समर्थपणे साकारते. आणि बदलत्या क्लेशदायक कृषिप्रधान ग्रामीण सामाजिक सिथतीगतीचे दर्शन घडविते. कादंबरीत खान्देशातील जामनेरच्या परिसरातील खान्देशी वऱ्हाडी ह्या मिश्र बोली भाषेतील पात्रांचे संवाद, बोलण्यातून त्यांचे प्रकटणारे स्वभाव व मनोधर्म, बोलीभाषेच्या काही स्वतंत्र लकबी, म्हणी व विशिष्ट शब्द योजनेतून कादंबरीचा आशय प्रत्ययकारी होतो.