Description
‘पोश्यांपोर’ हे राजू शनवार यांचे आत्मकथन अनेक अंगांनी लक्षणीय आणि महत्त्वाचे आहे. ते एक महत्त्वाचा सामाजिक आणि सांस्कृतिक दस्तऐवज तर आहेच खेरीज त्यात वापरली गेलेली जव्हारच्या परिसरात बोलली जाणारी बोलीही याआधी मराठी साहित्यात क्वचितच अवतरली असेल. कोकणा, वारली, ठाकर, महादेव कोळी, मल्हार कोळी, कातकरी अशा अनेक आदिवासी लोकांची भाषा, त्यांच्यातले परस्पर संबंध, चालीरिती, जगण्यातला संघर्ष आणि त्यासंबंधी तक्रार न करण्यातली असमंजस (!) सोशिकता या गुणांनी हे लेखन ओतप्रोत भरलेले आहे.
या लेखनातल्या दोन गुणांनी मला विशेष प्रभावित केले. लेखकाच्या मनातली कोवळीक आणि निवेदनातील सहज प्रामाणिकता, यामुळे आपोआपच हे लेखन वाचनीय आणि गुंतवून ठेवणारे झाले आहे. ते बोली भाषेत आहे. पण ती मराठीचीच बोली आहे. ती आपल्या लिखित गद्याला आणि प्रमाण भाषेला सशक्त करणारी आहे. अधिकाधिक बोली आपल्या साहित्याला या प्रकारे समृद्ध करत राहोत व त्यासाठी त्यांच्यात राजू शनवार निर्माण होत राहोत, अशी शुभकामना करतो. राजू शनवार यांना माझ्या अंतःकरणापासून शुभेच्छा आहेत.- रंगनाथ पठारे