Description
हा ग्रंथ रंगनाथ पठारेंच्या साहित्यकृतीतील स्त्रीचित्रणांची चिकित्सा असून प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे गेल्या चाळीस-पंचेचाळीस वर्षातील स्त्री-जीवनाची, स्त्री-चित्रणाची वाटचाल दर्शविणारा आहे. पठारे यांचा लेखन संघर्ष या काळातील सांस्कृतिक स्थितीशीही सुरू आहे. स्त्रियांसाठीच्या चळवळींशी, विचारधारांशी लेखक म्हणून त्यांचा संवादी संबंधही आहे, तरीही स्त्री-चित्रणात मर्यादा आल्या आहेत, असे संसूचन येथे झाले आहे.
साहित्याची चिकित्सा जीवनवादी आशयसूत्रांच्या आधारे करण्याचा हा एक चांगला प्रयत्न आहे. या ग्रंथातून पठारेंच्या साहित्यकृतींची पुन्हा पुन्हा वाचने होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरएक काळात साहित्यकृतींची पुन्हा पुन्हा विश्लेषणे होणे साहित्यसंस्कृतीची गतिमानता दर्शवितात. साहित्यकृतींच्या वाचनाच्या वैविध्यपूर्ण दृष्टिकोनांची निर्मिती होणे हे काव्यशास्त्राला गती देणे असते. गतीमानता निर्माण करणारा हा ग्रंथ स्वागतासाठी, चर्चेसाठी, नव्या वाचनदृष्टीसाठी प्रेरणा देणारा आहे.