Description
डॉ. राम वाघमारे यांनी सदरील ग्रंथात भालचंद्र नेमाडे व रंगनाथ पठारे यांच्या कादंबऱ्यांमधील जीवनानुभवाचा सांगोपांग शोध घेतला आहे. समकालीन मूल्यहासामुळे चिंतित झालेले हे कादंबरीकार नव्या पिढ्यांच्या मनात नवमूल्यांची पेरणी करतात. देशाचे आदर्श नागरिक घडवणारे शिक्षण क्षेत्र कसे सडून गेले आहे याचा प्रत्यय त्यांच्या कादंबऱ्यांमधून ते कसा करून देतात याचा शोध या ग्रंथात घेतलेला आहे, त्याचबरोबर महाविद्यालयीन तरुणांचे भावविश्व, स्वार्थाने बरबटलेले राजकारण, विविध दुष्प्रवृत्तींना बळी पडणारी स्त्री, सामान्यांचा शुष्क व्यवहारवाद आदी जीवनानुभवांचे स्वरूपही या ग्रंथात तटस्थपणे तपासले आहे. समाजातील तत्त्वनिष्ठ, उदारमतवादी, त्यागी, स्वाभिमानी, नीतिमान, बंडखोर अशा व्यक्तिरेखांबरोबरच एककल्ली, स्वार्थी, संधीसाधू, धूर्त, कारस्थानी, कपटी, कंजूष, लालसी, वासनांध, महत्त्वाकांक्षी, असहाय्य, सोशिक अशा व्यक्तिरेखांचेही दर्शन नेमाडे व पठारे यांच्या कादंबऱ्यांमधून कसे घडते, याचीही मांडणी राम वाघमारे यांनी नेमकेपणाने केली आहे. दोन्ही लेखकांच्या शैलीतील उपहासगर्भता, तिरकसपणा, संवादात्मकता, नागर ग्रामीण बोलीचा यथोचित वापर, प्रतिकात्मकता, म्हणी, वाक्प्रचार, भारुड, लोकगीते, संमिश्रता, सूक्ष्मता आदी गोष्टींची सोदाहरण मांडणी करणारा हा ग्रंथ आहे. तो अभ्यासकांना निश्चित उपयुक्त ठरेल.