Description
एकूणात दिसते असे की दीक्षित यांची प्रज्ञा आणि प्रतिभा प्राक्कथा,आदिकथा आणि मिथके यांची पुनर्मांडणी करून त्यांचा नवा अर्थ लावण्यात अधिक रस घेते. ही पुनर्मांडणी त्या अतिशय ताकदीने करतात. आपल्याला अभिप्रेत असलेली नवी मांडणी पठडीतल्या वाचकांना धक्कादायक वाटून वाङ्मयबाह्य गदारोळ उठेल या आशंकेपोटी जरूर तिथे संदर्भ द्यायलाही त्या विसरत नाहीत. अशाप्रकारे जुन्या मिथकांचा पुन्हा पुन्हा नवा अर्थ लावत नवी निर्मिती करीत राहण्याचे काम आपल्या संस्कृतीतल्या मौखिक परंपरेने सातत्याने केले आहे. हे करणाऱ्या बव्हंशी साऱ्या औपचारिक शिक्षणाचे संस्कार न लाभलेल्या अनाम प्रतिभावान स्त्रिया आहेत. पंडिती परंपरेचा वारसा घेऊन आपल्या लेखनात त्याच सच्चेपणाने विजया दीक्षित अशी नवी मांडणी करतात, हे त्यांचे महत्त्व आहे. ते करतानाचा त्यांचा दृष्टिकोण महत्त्वाचा आहे. वैचारिक पातळीवर त्या साऱ्या मानवी समूहांकडे ज्या गाढ सहानुभूतीने पाहतात, ते महत्त्वाचे आहे. ब्राम्हणी मध्यमवर्गाच्या तीन चार पिढ्यांमधल्या स्त्रियांची मानसिकता त्या पुरेशा आस्थेने, समझदारीने व अधिकृतपणे उभी करतात. यानिमित्ताने एकूण नात्यासंबंधी काही मांडणे हाही त्यांचा एक लक्षणीय प्रयत्न असतो. एकाच वाक्यात सांगायचे तर, दीक्षित यांची कथा ही भूमीचा पक्ष मांडणारी कथा आहे असे म्हणता येईल.
– रंगनाथ पठारे (प्रस्तावनेमधून)