Description
कथारचनेच्या विविध शक्यतांशी खेळणे हा रंगनाथ पठारे यांचा स्वभाव. मराठीत खूप कमी लेखकांनी कथेच्या रचनेच्या अंगाने तिच्याशी संवाद साधल्याचा दिसतो. कथा एक सत्त्वशोध आणि समकालीन वास्तवाला दिलेली तीव्र प्रतिक्रिया. स्वतःत चाललेली जीवघेणी घालमेल. रंगनाथ पठारे यांच्या प्रत्येक कथेत ही घालमेल प्रत्ययाला येते. ही घालमेल वाचकाला खूप आत आत आवर्तात घेऊन जाते. पठारे मराठी लघुकथेला कथेच्या मूळ स्वरूपाकडे घेऊन जात आहेत. रूढ पारंपरिक कथासमीक्षा दृष्टीस हा प्रकार आकळणे थोडे कठीणच. पण पन्नास वर्षांनंतर जो वाचक ‘गांधीजी अकरा सप्टेंबर २००१’ ही गोष्ट वाचेल तेव्हा या लेखकाच्या असाधारण प्रतिभाशक्तीची प्रगल्भता जाणवू शकेल. पठारे मौखिक परंपरेतील ज्ञानसंक्रमणाचे साधन म्हणून निर्मित झालेल्या कथापरंपरेस पचवून इथल्या मातीच्या कथा रचत आहेत, हे हा संग्रह वाचून प्रत्ययास येते.