Description
प्रत्येकच संतकवयित्रींच्या मागे कुणीतरी समकालीन पुरुष-विभूतीचा प्रभाव असल्याचा दावा ढोबळपणे करून त्या-त्या संतकवयित्रींचे स्वतंत्र अस्तित्व, प्रज्ञा झाकोळून टाकण्याचाच अन्यायकारी दृष्टिकोन दिसून येतो किंवा समग्र स्त्री-लिखित काव्याला ‘स्त्री-वाद’ ह्या एका गोंडस नामाभिधानाच्या खाली एकसुरीपणे हाताळले गेल्याचे दिसते. फार-फार तर दलित स्त्री-कविता, ग्रामीण स्त्री-कविता अशीही स्थल वर्गवारी केल्याचे आढळून येते. पण ह्या एकंदरच स्त्री-लिखित कवितेकडे ‘स्त्री’चे अस्खलित भावविश्व म्हणून मध्ययुगापासून ते उत्तर आधुनिक युगापर्यंत आलेखात्मकरित्या निखळ संवेदनशिलतेने स्वतंत्रपणे पाहण्याचा फारसा प्रयत्न झाल्याचे दिसून येत नाही. ज्या अविरत अतिधारेचे आपण व्रतस्थ प्रवासी आहोत तिचा उगम कुठून झाला, कोणत्या परिस्थितीत आणि अडथळ्यांतून ती विकसीत होत गेली? आजची तिची वाट कुठे भरकटत तर जात नाहीये ना, अस्सल काय आणि बेगडी पोकळ फुगे कोणते? या साऱ्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा हा एक निरागस प्रयत्न!
‘कविता’ हा वाङ्मयीन प्रकार शास्त्रीय कमी, भावनिक अधिक आहे. असं असताना भाषाशास्त्रीय पंडितांनी काव्यशास्त्र नावाखाली कवितेची चिरफाड करताना आशयसूत्राच्या संवेदनशीलतेचे सूक्ष्म कंगोरे अगदीच दुष्टपणे (किंवा वैज्ञानिक सुज्ञपणे) दुर्लक्षित केले.म्हणूनच काव्यक्षेत्रातल्या एकंदरच परिवर्तनाच्या प्रत्येक टप्प्यावर स्त्री- कवितेच्या संदर्भाने ह्या प्रत्येक प्रयोगशील काव्यवैशिष्ट्यांना अधोरेखित करण्याचा आणि त्या वैशिष्ट्यांसह स्त्री – कवितेचा प्रवास उलगडण्याचा हा प्रयत्न आहे.